टिक - टॉक ॲपसाठी पिस्तूलचा व्हिडिओ तयार करत असताना गोळी सुटून प्रतीकचा मृत्यू , शिर्डीतील प्रकरण


प्रतिनिधी / शिर्डी : येथील हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी प्रतीक संतोष वाढेकर (१९)  रा. शिर्डी  याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केल्यानंतर  तपासात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रतीक व त्याचे नातेवाइक टिक-टॉक ॲपसाठी पिस्तूलचा व्हिडिओ तयार करत असताना गोळी सुटून प्रतीकच्या छातीत लागून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. 
प्रतीक वाढेकरच्या मृत्यूप्रकरणी त्याचा नातेवाइक सनी पोपट पवार (२०)  रा. फलटण, सातारा , नितीन अशोक वाढेकर रा. शिर्डी असे अटक केलेल्या दोघा आरोपींचे नावे असून, एक जण फरारी असून, त्याचा पोलिस शोध घेत आहे. प्रतीक वाढेकर हा शिर्डीचा रहिवासी असला तरी बाहेगावी शिक्षणासाठी होता. चुलत्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तो शिर्डीत आला होता. प्रतीक व इतर तिघांना शिर्डीतील हॉटेल पवनधाम येथे रुम घेतली होती. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रुममध्ये छातीत गोळी लागून प्रतीकचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिघेही रुममधून पळून गेले होते. हॉटेलमालकाने ही माहिती दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये पळून गेलेल्यांची नावे असल्याने त्यांच्याविरुद्ध खून करणे, आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. मंगळवारी रात्री शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी आरोपींचा शोध सुरू केला. शिर्डी रेल्वे स्टेशनजवळ लपून बसलेल्या सनी पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर नितीन अशोक वाढेकर याला पोलिसांनी पकडून दोघांकडे चौकशी केली. त्यात मृत प्रतीक वाढेकर व इतर तिघे रुममध्ये टिक-टॉक ॲपसाठी मोबाइलवरून व्हिडिओ तयार करत होते. सनी पवार याच्या हातात गावठी पिस्तूल होते. व्हिडिओ तयार करण्याच्या नादात सनी पवारकडून पिस्तूलमधून गोळी झाडली गेली. ही गोळी प्रतीकच्या छातीत घुसली, त्यामुळे सर्व जण पळून गेले, असे पोलिस तपासात समोर आले आहे. 
''प्रतीक वाढेकर व त्याचे नातेवाइक हे एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्या वेळी सनी पवार याच्याकडे गावठी पिस्तूल होते. पिस्तूलचा वापर करून तो टिक-टॉक व्हिडिओ करत होता. त्या वेळी पिस्तूल हाताळताना सनी पवारकडून गोळी सुटून ती प्रतीकच्या छातीत घुसून त्याचा मृत्यू झाला. पवार हा सातारा जिल्ह्यातील आहे. त्याने गावठी पिस्तूल कुठून आणले याबाबत प्राथमिक माहिती मिळाली आहे.'' 
- सोमनाथ वाघचौरे, 
पोलिस उपविभागीय अधिकारी, शिर्डी 

   Print


News - Rajy | Posted : 2019-06-13


Related Photos