आमदाराने घेतली थेट मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावानं आमदारकीची शपथ


वृत्तसंस्था / अमरावती :  आंध्रातील एका नवनिर्वाचित  आमदाराने  थेट मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावानं आमदारकीची शपथ घेण्याचा पराक्रम केला आहे. आंध्रातील या प्रकारामुळं राजकारणातील 'होयबा' संस्कृतीची जोरदार चर्चा देशात रंगली आहे. 
श्रीधर रेड्डी असं या आमदार महाशयांचं नाव असून ते नेल्लोर मतदारसंघातून वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आंध्र विधानसभेतील नव्या सदस्यांनी बुधवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. सर्वसाधारणपणे नवनिर्वाचित आमदार किंवा नवनियुक्त मंत्री ईश्वर, राज्यघटना किंवा विवेकबुद्धीला स्मरून शपथ घेतात. मात्र, श्रीधर रेड्डी यांनी शपथ घेताना मुख्यमंत्री जगनमोहन यांचं नाव घेतलं. त्यांचे हे बोल कानी पडताच सगळेच बुचकळ्यात पडले. विधानसभा अध्यक्ष संबांगी अप्पाला नायडू यांनी रेड्डी यांना लगेचच रोखले आणि पुन्हा शपथ घेण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी ईश्वराला स्मरून शपथ घेतली. 
श्रीधर रेड्डी यांनी स्वत:च्या या कृतीचं समर्थन केलं. तेलुगू देसम पक्षाच्या काही आमदारांनीही यापूर्वी एनटी रामाराव यांच्या नावे शपथ घेतलीय. त्यांना तशी परवानगीही मिळाली होती. मी माझ्या नेत्याला देव मानत असेल तर काय चुकलं,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'मी एका सामान्य कुटुंबातून आलोय. कुठलीही आशा-अपेक्षा नसताना जगनमोहन यांनी मला दोनदा आमदार बनवलंय,' अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. 

   Print


News - World | Posted : 2019-06-13


Related Photos