मानव-वन्यजीव संघर्ष चिघळण्यापूर्वीच वाघांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हालाच वाघांना ठार मारण्याचे आदेश द्यावे लागेल : आ. वडेट्टीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / ब्रम्हपुरी : 
 ब्रम्हपुरी वन विभागातील मानव-वन्यजीव संघर्ष चिघळण्यापूर्वीच वाघांचा बंदोबस्त करावा.  अतिरिक्त वाघ व बिबटे अन्यत्र स्थलांतरित करावे, अन्यथा आम्हालाच वाघांना ठार मारण्याचे आदेश गावकऱ्यांना द्यावे लागतील, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी उपवनसंरक्षक कार्यालयात आयोजित प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या बैठकीत  दिला.
ब्रम्हपुरी उपवनसंरक्षक कार्यालयात वाघ व बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर  प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के.अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला आमदार विजय वडेट्टीवार, जि.प. सदस्य राजेश कांबळे, ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण, उपवनसंरक्षक कुलराजसिंग, गोखले उपस्थित होते. ब्रम्हपुरी परिसरात सात दिवसात तीन तर सव्वापाच महिन्यात १५ लोकांना वाघ व बिबटय़ाने ठार केले. येथे सध्या ४२ वाघ, ८२  बिबट आणि २२ छावे आहेत. त्यातही ४२ वाघांमध्ये २७ मादी असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात  संख्येने वाघ अधिक आहेत. मानव-वन्यजीव संघर्षांवर वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया अभ्यास प्रकल्प राबवत आहे. वाघांच्या स्थलांतरणाचा प्रयोग यशस्वी झालेला नसला तरी त्यावर विचार सुरू असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी सांगितले.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-13


Related Photos