वन्यप्राण्यांची घुसखोरी रोखण्यासाठी ब्रम्हपुरी वनविभागात जंगलालगतच्या शेतांमध्ये लावणार ‘फॉक्सलाईट’


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
: चंद्रपूर जिल्ह्यातील   ब्रम्हपुरी वनविभागात मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटना लक्षात घेता  ‘फॉक्सलाईट’ ची चाचणी यशस्वी ठरली आहे. जंगलालगतच्या शेतांमध्ये ‘फॉक्सलाईट’ लावण्यात येणार आहेत. फॉक्सलाईट’ ही एक अतिशय लहानशी यंत्रणा आहे. यात वेगवेगळ्या रंगांचे, अगदी लहान वीजदिवे आहेत. एकापाठोपाठ एक रंगांचा प्रकाश यातून बाहेर पडतो. शेतात येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या उंचीनुसार आणि वन्यप्राण्यांच्या डोळ्यावर त्या रंगांचा प्रकाश पडेल यापद्धतीने ते लावले जातात. यामुळे वन्यप्राण्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतो आणि ते शेताकडे फिरकत देखील नाहीत. विशेष म्हणजे, यासाठी विजेची गरज नाही. सौरऊर्जेवर ही यंत्रणा चालते.
 शेतातील वन्यप्राण्यांची घुसखोरी हे   मानव-वन्यजीव संघर्षांमागील एक कारण आहे. राज्य सरकारचा ‘व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’(व्हीएसटीएफ) हा एक उपक्रम महाराष्ट्रात सुरू आहे. यात नागभिड आणि चिमूर तालुक्यातील ४९ गावांचा समावेश असून २१ गावांमध्ये मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक निवडण्यात आले आहेत. ही ४९ गावे ब्रम्हपुरी वनविभागाच्या हद्दीत आहेत. एकीकडे मानव-वन्यजीव संघर्ष आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान हे वनखात्यासमोर मोठे आव्हान आहे. व्हीएसटीएफ या उपक्रमाच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धन संस्थेच्या(वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट-डब्ल्यूसीटी) माध्यमातून या गावांमधील काही शेतांमध्ये रानडुक्कर, नीलगाय, चितळ  या प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून ‘फॉक्सलाईट’ लावण्यात आले होते. कवडशी देशमाने या गावातील नीलेश्वर वंजारी आणि लावारी गावातील मारुती वाढई यांच्या शेतात त्याची चाचणी करण्यात आली. ते लावल्याने शेतात येणाऱ्या रानडुक्कर आणि नीलगाईचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. नीलेश्वर वंजारी व मारुती वाढई या दोन्ही शेतमालकांनी हे वन्यप्राणी शेतात आलेच नसल्याचे सांगितले. ‘फॉक्सलाईट’मुळे शेतपिकाचे नुकसान बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्याचेही ते म्हणाले. या पद्धतीमुळे शेतपिकांचे नुकसान कमी होते हे गावातील इतरही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ही यंत्रणा त्यांच्याही शेतात कार्यान्वित करण्याची मागणी  केली. शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बाब असून येत्या काळात शेतात या पद्धतीचा उपयोग करण्यात येणार असल्याचे कवडशी देशमाने या गावातील मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक आशीष बोदनवार यांनी सांगितले. वन्यजीव संवर्धन संस्थेने ही जबाबदारी स्वीकारली असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ही यंत्रणा  लावून दिली जाणार आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-12


Related Photos