स्वतंत्र विदर्भ, अहेरी जिल्हा आणि पेरमिली तालुक्याच्या मागणीसाठी नागरीकांचा चक्काजाम


- चार तास आलापल्ली - सिरोंचा मार्गावर वाहतूक खोेळंबली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पेरमिली
: स्वतंत्र विदर्भ राज्य, अहेरी जिल्हा आणि पेरमिली तालुक्याची निर्मिती करावी यासह विविध मागण्यांसाठी पेरमिली तसेच परिसरातील अनेक गावातील नागरीकांनी आलापल्ली - सिरोंचा मार्गावर चार तास चक्काजाम आंदोलन केले. यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता. दोन्ही बाजूस वानांच्या रांगा लागल्या होत्या.
पेरमिली परिसरातील ३० ते ४० गावे तहसील कार्यालयापासून २० ते २५ किमी अंतरावर आहेत. अनेक गावातील नागरीकांना पेरमिली पर्यंत पायपीट करावी लागते. यामुळे शारीरीक व आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो. पेरमिली परिसरातील विजपुरवठा वारंवार खंडीत होतो. नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यामुळे 33 केव्ही उपकेंद्राची निर्मिती करावी, बॅंक ऑफ महाराष्ट्राची एकच शाखा असल्याने नागरीकांना बॅंकेच्या व्यवहारासाठी .त्रास सहन करावा लागतो. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा निर्माण करावी, वरीष्ठ महाविद्यालय व आयटीआय निर्माण करावे, महसूल मंडळाची निर्मिती करून नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. 
उपविभागीय अधिकारी बावनगडे तसेच नायब तहसीलदार गुचे यांनी आंदोलनस्थळी येवून निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत दुर्गे यांनी केले. शेकडो नागरीक रस्त्यावर उतरले होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-12


Related Photos