जहाल नक्षली नर्मदाक्का सह पती किरणदादाला तेलंगणा पोलिसांच्या मदतीने सिरोंचा बसस्थानकावर अटक, सात दिवसांची पोलिस कोठडी


- नक्षली चळवळीचे धागेदोरे उलगडणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
दंडकारण्यातील जहाल नक्षली, सामान्यांमध्ये कायम दहशत पसरविणारी नर्मदाक्का व तिचा पती किरणदादा यांना तेलंगणा पोलिसांच्या मदतीने सिरोंचा बसस्थानकावर अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज १२ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे. पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. हरी बालाजी, अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत उपस्थित होते.
दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्या तसेच वेस्टर्न सबझोनल प्रमुख उप्पगुंटी निर्मलाकुमारी उर्फ नर्मदाक्का (५८) रा. कोडापावनुरू गलावरम मंडल जिल्हा कृष्णा (आंध्रप्रदेश) आणि तिचा पती राणी सत्थ्यनारायण उर्फ किरण उर्फ किरणदादा (७०) रा. नरेंद्रपुरम, अमलापुरम जवळ राजाराम मंडल, जिल्हा इस्ट गोदावरील आंध्रप्रदेश हे दोघे १० जून रोजी सिरोंचा बसस्थानकावर असल्याची माहिती पोलिस दलास मिळाली. मागील अनेक दिवसांपासून या दोघांच्या मागावर पोलिस होते. दोघेही तेलंगणा राज्यातून सिरोंचा मार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती गडचिरोली आणि तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. यानंतर तेलंगणा पोलिसांच्या सहकार्याने अतिशय शिताफीने सापळा रचून दोघांनाही अटक केली. काल ११ जून रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. गडचिरोली न्यायालयाने दोघांनाही ७ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. दोघांचीही कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.

१ मे रोजीच्या भुसुरूंग स्फोटाच्या कटात सहभाग

नर्मदाक्का हिचा नक्षल्यांनी पोलिसांविरूध्द घडवून आणलेल्या अनेक नक्षल गुन्ह्यांमध्ये सक्रीय सहभाग होता. १ मे रोजी कुरखेडा उपविभागातील जांभुळखेडा येथे नक्षल्यांनी स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. तसेच खासगी वाहनचालक मृत झाला होता. या स्फोटाच्या कटात नर्मदाक्का आणि तिचा पती किरणदादा यांचा मुख्य सहभाग होता. तसेच नर्मदाक्का हिच्यावर गडचिरोली जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात ६५ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे दोघांवरही प्रत्येकी २५ लाखांचे बक्षिस जाहिर आहे. तसेच छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातही लाखोंचे बक्षिस आहे. किरणदादा हा दंडकारण्य पब्लीकेशन टिमचा प्रमुख आहे. तसेच नक्षल्यांच्या प्रभात मासिकाचादेखील तो प्रमुख आहे. या दोन जहाल नक्षल्यांच्या अटकेमुळे नक्षल विरोधी कारवाईत गडचिरोली पोलिस दलाला मोठे यश मिळाले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-12


Related Photos