कोचीनारा जंगल परिसरात हत्तींचा धुमाकूळ , वनरक्षकास भिरकावले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
जंगलात भटकलेल्या  हत्तीने वनरक्षकास भिरकावल्याची  घटना कोरची तालुक्यातील  कोचीनारा जंगल परिसरात   घडली. यामुळे वनरक्षक गंभीर जखमी  झाला आहे. ज्ञानेश्वर चिल्लमवार असे  गंभीर जखमी वनरक्षकाचे नांव आहे. 
 प्राप्त माहितीनुसार कोरची  तालुक्यातील बेडगाव  वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोचीनारा  व सातपुती जंगल परिसरात  भटकलेले हत्ती असल्याची माहिती  बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास मिळाली असता वनाधिकारी संपूर्ण  चमूसह जंगल परिसरात हत्तीचा शोध  घेत असताना अचानक हत्ती  वनरक्षकांना दिसला. त्यामुळे गोंधळ  उडाला. तेवढ्यात दुसरा हत्ती  वनरक्षकाच्या मागे धावला. त्याने ज्ञानेश्वर चिल्लमवार या वनरक्षकाला  आपल्या सोंडेमध्ये पकडून हवेत  फेकले. यात वनरक्षक चिलमवार  झाडाला जाऊन आदळल्याने  वनरक्षक चिल्लमवार यांना गंभीर  दुखापत झाल्याची माहिती प्राप्त झाली  आहे. चिल्लमवार यांच्या चेहऱ्याला ,  कंबरेला तसेच पायाला गंभीर  दुखापत झाली आहे. चिल्लमवार  यांना प्राथमिक उपचारासाठी  जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात  नेल्यानंतर चिल्लमवार यांना  गडचिरोली येथील जिल्हा  रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. चिल्लमवार यांचा पाय  गुडघ्यापासून तुटल्याचेही कळते.  
सिमेलगतच्या  राज्यातून हत्ती कोरची  तालुक्यातील बेडगाव  वनपरिक्षेत्रांतर्गत  येणाऱ्या कोचीनारा व  सातपुती जंगल  परिसरात भटकत  आल्याची माहिती  आहे. या भटकलेल्या  हत्तींनी बेडगाव  वनपरिक्षेत्रांतर्गत  येणाऱ्या कोचीनारा व  सातपुती जंगल  परिसरात दहशत  माजविली आहे.  त्यामुळे बेडगाव  वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावामध्ये  दहशतीचे वातावरण निर्माण झाले  आहे. मात्र अद्यापही हत्तींना  पकडण्यात आले नाही. त्यामुळे संपूर्ण  परिसरात दहशतीचे वातावरण कायम  आहे. वनविभागाने या भटकलेल्या  हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करावी,  अशी मागणी परिसरातील  नागरिकांतून केली जात आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-12


Related Photos