शिर्डीत १९ वर्षीय तरुणाच्या गळ्यावर बंदुकीची गोळी झाडून हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी : 
 शहरातील नालारोडलगत असलेल्या हाँटेल पवनधाममध्ये अज्ञात चार व्यक्तींनी १९ वर्षाच्या तरुणाच्या गळ्यावर बंदुकीची गोळी झाडून हत्या केली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रतिक संतोष वाडेकर रा. लक्ष्मीनगर शिर्डी असे मृताचे नाव आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. यातील चार संशयित मारेकरी पैकी मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना झाली आहे.
मंगळवारी हाँटेल पवनधाम येथे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लक्ष्मीनगर येथील नितीन वाडेकर याच्याबरोबर प्रतिक वाडेकर या दोघांसह पाच जणांना फ्रेश होण्यासाठी रुम नंबर १०४ भाड्याने देण्यात आली होती. पाचजण रुममध्ये जाताच हाँटेल मालक गोविंद गरूर यांना जोरात गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. यावेळी हाँटेल मालक यांनी बाहेर येऊन बघीतले असता तर चारजण पहिल्या मजल्यावरून खाली उतरून पळून जातांना दिसले. यावेळी यातील एका इसमास गोविंद गरूर यांनी पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने पलायन केले. यानंतर गरुर यांनी रूममध्ये गोळी लागून जखमी झालेल्या अवस्थेत प्रतिक संतोष वाडेकर यांस बघीतल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत झालेला सर्व प्रकार कथन केला.
दरम्यान, शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कसून चौकशी सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी तीन पोलीस पथके तैनात करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. याबाबत घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-06-12


Related Photos