नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दलाल एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
दुचाकी वाहनाच्या कागदपत्रांच्या दुय्यम प्रती काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून ३ हजारांची लाच स्वीकारताना नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील दलाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. 
विजय विश्वनाथ हुमने (५०)  असे लाचखोर दलालाचे नाव आहे. तक्रारदार दादरापुलाजवळ भानखेडा टिमकी नागपूर येथील रहिवासी आहे. तो नागपूर महानगर पालिकेत नोकरीवर आहे. एमएच ३१  सीवाय ५०  या मोपेड वाहनाची कागदपत्रे हरविल्यामुळे कागदपत्रांच्या दुय्यम प्रति काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावून तेथील कर्मचाऱ्यांना  भेटला. यावेळी त्याला एक फार्म देण्यात आला. सोबत एका व्यक्तीचे नाव व संपर्क क्रमांक देण्यात आले. तक्रारदाराने आरटीओ कार्यालयाबाहेर विजय हुमने या दलालास भेटले. हुमने याने तक्रारदारास कागदपत्रांच्या दुय्यम प्रतिसाठी पोलिस तक्रारीची काॅपी, आरटीओ कर्मचारी व स्वतःकरीता ३ हजार रूपये लागतील असे सांगितले. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.
तक्रारीवरून आज ११  जून रोजी सापळा रचण्यात आला. दलाल विजय हुमने याने ३ हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्यावर सिताबर्डी नागपूर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायदा १९८८  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदर कारवाई पोलिस उपायुक्त/ पोलिस अधीक्षक (अतिरीक्त कारभार) श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक सुनिल बोंडे, नापोशि रविकांत डहाट, पोलिस शिपाई मंगेश कळंबे, महिला पोलिस शिपाई अस्मिता मेश्राम, मंजुषा बुंधाळे, पोलिस हवालदार वकील शेख यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-11


Related Photos