महत्वाच्या बातम्या

 नुसता घोषणांचा बाजार : औषधी व डॉक्टर नसल्याने रुग्ण बेहाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज असताना शासनाकडून आयुष्मान भारत, आयुष्मान भव, आपला दवाखाना अशा लोकप्रिय आरोग्य सुविधांच्या घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्षात डॉक्टर व औषधी नसल्याने शासनाचा नुसता घोषणांचा बाजार सुरू असून ग्रामीण भागातील रुग्ण बेहाल असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष व आरोग्य समितीच्या सभापती कुंदा राऊत यांनी केला.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आरोग्य सेविका, आरोग्य सेवक नाही, औषधी उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना ती मिळत नाही. याचा विचार करता ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी जि.प. च्या अखत्यारित पूर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक दवाखाने कार्यरत आहेत. त्यातच गेल्या १ मे पासून आपला दवाखानाही सुरू झाला आहे. कळमेश्वर आणि काटोल तालुका वगळता उर्वरित अकराही तालुक्यांमध्ये हे दवाखाने सुरू झाले आहेत. येथे कंत्राटी डॉक्टर आहेत; परंतु परिचारिका नाही. वास्तविक शेतमजूर, कामगार वर्गांना या दवाखान्याचा लाभ होणे अपेक्षित आहे; परंतु येथे औषधसाठा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, शून्य ते १६ वयोगटातील बालकांसाठी आवश्यक लसींचाही येथे पुरवठा वेळेत होत नाही. जि.प.च्या आरोग्य समितीच्या बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली परंतु शासन याबाबत गंभीर नसल्याचे कुंदा राऊत यांनी सांगितले.

औषध साठा नसल्याने आपला दवाखाना आजारी -

शहरासोबतच ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना ताप, सर्दी, खोकला, पोटदुखीसारख्या छोट्या आजारांसाठी घराजवळ मोफत उपचार मिळावेत, तसेच मधुमेह आणि रक्तदाबासह आवश्यक चाचण्यांची व औषधांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यात असे १२ दवाखाने सुरू करण्यात आले; परंतु येथे परिचारिका नाही, शासनाकडून औषध पुरवठा होत नसल्याने आपला दवाखानाच आजारी पडल्याचे कुंदा राऊत यांनी सांगितले.

मागणी करूनही औषधी मिळत नाही -

औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णसंख्या ओसरत असून, आगामी काळात आपला दवाखाना औषधी अभावी बंद पडण्याची श्क्यता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही आवश्यक औषधसाठा उपलब्ध नाही. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह रुग्णांना दर आठवड्याला औषधासाठी जावे लागते. आधी एक महिन्याचे औषध मिळत होते.

आयुष्मान भव उपयोग काय?

औषध तुटवडा असताना उपक्रमांच्या आरोग्य शिबिरात तपासणी करणाऱ्यांना आवश्यक औषधे उपलब्ध होत नाही. उपक्रम राबविण्यापूर्वी आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली.





  Print






News - Nagpur




Related Photos