राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी मानले आभार


-  पवार-धानोरकर भेटीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर
: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी मुंबईत भेट घेऊन आभार मानले. पवार आणि धानोरकरांच्या या भेटीमुळे मात्र काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. 
 काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात कारणीभूत ठरल्याने धानोरकर यांनी शरद पवार यांची भेट घेत आभार मानल्याचे बोलल्या जात आहे.   विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी धानोरक यांना  उमेदवारी पवार यांच्यामुळे नव्हे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मिळाल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे  राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. 
चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी बऱ्याच घडामोडी झाल्या होत्या. विशाल मुत्तेमवार, विनायक बांगडे यांच्याऐवजी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू  धानोरकर यांना  उमेदवारी कशी मिळाली हे सर्वश्रूत आहे. या घडामोडीत शरद पवार यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती व धानोरकर यांनीही पवार यांच्यामुळेच उमेदवारी मिळाली असे जाहीरपणे सांगितले होते. यात विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचाही खारीचा वाटा होता. धानोरकरांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी वडेट्टीवार व सुभाष धोटे दिल्लीत पंधरा दिवस ठाण मांडून होते. मात्र, प्रयत्न कामी येत नाही  हे लक्षात येताच दोघेही माघारी आले होते. शेवटी शरद पवार यांच्या शब्दाने काम केले. वडेट्टीवार यांनी ६ जून रोजी धानोरकर यांच्या सत्कार कार्यक्रमात उमेदवारी शरद पवार यांच्यामुळे नाही तर अशोक चव्हाण यांच्यामुळे मिळाल्याचे सांगितले होते. त्यानंतर धानोरकर यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन आभार मानले. विशेष म्हणजे, प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीतही धानोरकर यांनी पवार यांचे आभार मानले होते.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-10


Related Photos