महत्वाच्या बातम्या

 सोयाबीनवरील चारकोल रॉट रोगाची शास्त्रज्ञांकडून पाहणी


- रोग नियंत्रणासाठी सूचविल्या उपाययोजना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे पिक मोठ्या प्रमाणावर पिवळे पडत आहे. पिके नेमके कशामुळे पिवळे पडत आहे, याची तपासणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार शास्त्रज्ञांनी या रोगाची पाहणी करुन उपाययोजना सुचविल्या.

कृषि विद्यापीठाच्या, अकोला, सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावती, कृषि महाविद्यालय नागपूर व कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील शास्त्रज्ञांनी ही पाहणी केली. या पाहणी दरम्यान सोयाबीन हे चारकोल रॉट म्हणजेच मुळकुज व खोडकुज या दोन रोगांनी प्रादुर्भावग्रस्त होऊन पिवळे पडले, पाने मलूल झालेत आता त्यावर सुद्धा दुसरी बुरशी तयार होत आहे, जमिनीलगतच्या खोडांवर कोळश्यासारखी काळी बुरशी दिसत आहे, खोड चिरून बघितले असता ते सुद्धा आतमधून या बुरशीमुळे ते काळसर झालेले आहे, मुळे कुजल्यामुळे ती झाडे अलगद उपडल्या जात आहे,  त्यामुळे या झाडांवर अन्नद्रव्यांचा पुरवठा न झाल्यामुळे शेंगा भरत नसून ती झाडे पुर्णपणे पिवळी होऊन वाळून मुळावर करड्या भुरकट रंगाची बुरशी दिसते. ही अवस्था किंवा झाड परत दुरुस्त होऊ शकत नाही. काही शेतांमध्ये हे प्रमाण ७० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून आले.

सोयाबीन रोगशास्त्रज्ञ डॉ. राजु घावडे यांनी रोगापासून वाचण्यासाठी ज्या शेतांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रादुर्भाव आहे तेथे टेबुकोनाझोल १० टक्के + गंधक ६५ टक्के डब्लुजी या बुरशीनाशकाची २.५ ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच शक्य होईल तेथे ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची त्या पॅचेस मध्ये आळवणी करावी, असे त्यांनी सांगितले

सोयाबीन पैदासकार डॉ. सतीश निचळ यांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, फुले संगम हे वाण या रोगास सर्वात जास्त बळी पडले असुन व फुले किमया या वाणावर सुद्धा या रोगाची लक्षणे भरपूर प्रमाणात दिसून आलीत. लवकर परिपक्व होणारे वाण जसे जेएस-९३०५ हे या परिस्थितीतून सुटल्या गेले असे त्यांनी सांगितले.

डॉ. वर्षा टापरे यांनी शेतकऱ्यांना या बद्दल असे सांगितले की, चारकोल रॉट म्हणजेच मुळकुज हा रोग सोयाबीन या पिकावर येण्याच्या कारणांमध्ये प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यात पावसाचा पडलेला खंड व त्यावेळेस तापमानात झालेला चढ उतार त्यामुळे जमिनीचे तापमान वाढले ज्यामुळे जमिनीत असलेली बुरशी ही सक्रीय झाली. त्यावर आलेला तिन ते चार दिवस पाऊस व लगेच पावसात पुन्हा खंड व वाढलेले तापमान यामुळे ही बुरशी एकदम वाढून सोयाबीन पिकावर त्याचा प्रादुर्भाव दिसू लागला.

वातावरणात एकदम होणारा बदल, प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात जास्त दिवस पावसाचा खंड यामुळे वाढते परंतु आपण या रोगाला बळी न पडणारे वाण वापरावे, लवकर परिपक्व होणारे वाण निवडावे, पेरतांना बुरशीनाशक व ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. ही बुरशी रबी हंगामात हरभरा पिकावर येणार नाही पण त्यावर मर रोग येऊ शकतो म्हणून ट्रायकोडर्माचा वापर करावा या करिता प्रती एकरी २ किलो/लिटर ट्रायकोडर्मा दहा ते बारा घमेले शेणखत घेऊन त्यामध्ये मिक्स करून त्यावर जुटाचे पोते ओलसर करून १० ते १२ दिवस सावलीत ठेवावा. यामुळे ट्रायकोडर्मा जिवाणूंची संख्या दुप्पट ते चारपट वाढतो व मग त्यानंतर ते शेणखत मिश्रित ट्रायकोडर्मा संपुर्ण एका एकरात समप्रमाणात पसरून द्यावा जेणेकरून ट्रायकोडर्मा हा जिवाणू जमिनीत भरपूर संख्येत वाढेल व रोगांपासून पीक संरक्षण होईल.

प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावतीच्या प्रमुख डॉ. वर्षा टापरे यांच्या नेतृत्वात सोयाबीन पैदासकार डॉ. सतीश निचळ, सोयाबीन रोगशास्त्रज्ञ डॉ. राजु घावडे, सोयाबीन कृषिविद्या तज्ञ डॉ. मंगेश दांडगे, कृषि महाविद्यालय नागपूर च्या किटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. तांबे यांच्यासोबत डॉ. हरीश सवई, डॉ. पाटील तसेच कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा चे प्रमुख डॉ. जीवन कतोरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांच्या संयुक्त पथकाने सात गावांमध्ये तेरा शेतकऱ्यांच्या शेतावर पाहणी केली.





  Print






News - Wardha




Related Photos