महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०


- जिल्ह्यातील २५ उपकेंद्रासाठी २६९ एकर जमीनीचे भाड़ेपट्टा करार 

- जमीन मालकांकडून २६ उपकेंद्रांच्या परिसरात ३०२.५५ एकर जागा उपलब्ध 

- जमीन मालकांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध हेक्टरी सव्वालाख मिळणार  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे व चंद्रपूर मंडलाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी, चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी विनय  गौड़ा जी.सी.(भा.प्र.से.), यांची सदिच्छा भेट घेऊन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्ह्यातील २५ उपकेंद्रासाठी २६९ एकर जमीनीचे भाड़ेपट्टा करार करुन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे अभिनंदन केले व महसूल विभागाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. 

सौर ऊर्जा तयार करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०  हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून राज्य सरकारचा प्रमुख प्रकल्प  म्हणून त्याच्या अंमलबजावणीवर सर्वांनी भर द्यावा व जमीन उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आपला जिल्हा सर्वप्रथम शेतीसाठी शंभर टक्के सौर ऊर्जा वापरणारा होईल व जिल्ह्यात शेतीला दिवसाचे २४ तास वीज उपलब्ध होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्दीष्ट ठेवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री  तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या शुभारंभप्रसंगी केले होते. 

सदर योजनेमुळे ग्रामीण भागात सुमारे १९ हजार रोजगार निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला हातभार लागणार आहे. या दिशेने चंद्रपूर परिमंडळाद्वारा पाऊल उचलण्यात आले असून महावितरणच्या चंद्रपूर जिल्हयातील ५८ विविध उपकेंद्रांच्या परिसरामध्ये एकंदरीत ६७९ एकर जमिनीची आवश्यकता आहे व ४५ उपकेंद्र परिसरात जमीनीचा शोध पूर्ण झाला आहे. खाजगी जमीन मालकांकडून २६ उपकेंद्रांच्या परिसरात ३०२.५५ एकर जागा उपलब्ध झाली असून ७ उपकेंद्रांच्या परिसरात ५८ एकर जागा अंशत: मिळाली आहे. या सव्वीस खाजगी जमीन मालकांना आता हेक्टरी सव्वालाख्‍ मिळणार आहेत.   

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा वापरून ७ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करणे आणि २०२५ पर्यंत ३० टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविणे असे मिशन २०२५ या अभियानाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले आहे. महावितरणच्या जवळच्या ३३/११ कि.व्हो. उपकेंद्राच्या ५ किमीच्या परिघात आहे अशा पडीक जमिनीतून सौरउर्जा पिकविण्याची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना  २.० मधून दरवर्षी हेक्टरी सव्वा लाख रुपये मिळण्याची शेतकरी बांधवांच्या दारी सुवर्णसंधी उपलबध झाली आहे. 

ही संधी खाजगी जमीन मालक ज्यांची जमीन महावितरणच्या जवळच्या ३३/११ कि.व्हो. उपकेंद्राच्या ५ किमीच्या परिघात आहे. अशांना पण उपलब्ध्‍ असणार आहे तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.० अंतर्गत शासकिय पडीक जमीन, निमशासकिय जमीन, महापारेषण, महावितरण, महानिर्मीती विविध  आस्थापनाकडे असलेल्या अतिरिक्त जमीनी वापरण्यात येतील व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे स्वप्न साकारण्यात येणार आहे. 

शेतीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याप्रमाणेच आगामी काळात ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा, दवाखाने, पिण्याचे पाणी, ग्रामपंचायत कार्यालये इत्यादी सौर  ऊर्जेवर चालविण्यात येण्याचा मानस आहे. जिल्ह्यातील पडीक जमिनधारक शेतकऱ्यांनी/ईच्छुकांनी योजनेच्या अटींस अनुसरुन जमिन भाड्याने द्यावी. दरवर्षी  हेक्टरी सव्वा लाख रुपये मिळण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे, चंद्रपूर परिमंडळ व अधिक्षक अभियंता संध्या  चिवंडे, चंद्रपूर मंडळ यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos