भारताचा ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी दणदणीत विजय


वृत्तसंस्था / लंडन : ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला. 
भारतीय संघाने दिलेल्या ३५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३१६ धावांवर संपुष्टात आला. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ६९ धावा केल्या. 
भारताने दिलेल्या खडतर आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं सावध सुरुवात केली होती. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार अॅरॉन फिंच यांनी मैदानात चांगलाच जम बसवला होता. केदार जाधवने अफलातून थ्रो देत सलामी जोडी फोडली. फिंच ३६ धावांवर धावचीत झाला. वॉर्नर आणि स्मिथ जोडीने ऑस्ट्रेलिचा डाव सावरला. दोघांनीही अर्धशतकं ठोकली. वॉर्नर(५६) बाद झाल्यानंतर ख्वाजा आणि स्मिथने मैदानात टीच्चून फलंदाजी केली. स्मिथ-ख्वाजाची भागीदारी भारताच्या नाकी नऊ ठरत असताना भुवनेश्वर कुमारने भारताला कमबॅक करुन दिलं. भुवनेश्वरने सामन्याच्या ४० व्या षटकात स्मिथला(६९) पायचीत केलं. त्याच षटकात मार्कस स्टॉयनीसला खातही उघडू न देता भुवनेश्वरने माघारी धाडलं. त्यानंतर ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होत गेले. अखेरीस भारतीय संघाने सामना ३६ धावांनी जिंकला. 
तत्पूर्वी, शिखर धवनचं दमदार शतक आणि कर्णधार कोहलीच्या तडफदार ८२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचा डोंगर उभारला. वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचलेली भारतीय संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. 

   Print


News - World | Posted : 2019-06-10


Related Photos