देसाईगंजच्या मुस्लीम तरुणांनी केली दमा रुग्णांच्या भोजणाची व्यवस्था


-  साडे तीनशे किलो मसाला भाताचे केले वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
तालुक्यातील कोकडी येथे काल ८ जून रोजी मृग नक्षत्राच्या पर्वावर देण्यात आलेल्या  आयुर्वेदिक दमा औषधींचा लाभ घेण्यासाठी दमा आजाराने ग्रस्त रुग्णांचे जत्थेच्या जत्थे दाखल झाले होते.  दरम्यान जेवणाच्या व्यवस्थेवरुन अनेकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेता देसाईगंज येथील मुस्लिम युवकांनी प्रेम,भाईचारा,सद्भावना याचा परिचय देत दमा रुग्णांच्या भोजणाची व्यवस्था करून जवळपास साडेतीनशे किलो मसाला भाताचे वितरण करून गैरसोय टाळण्यात मौलिक भुमिका बजावली. 
 देसाईगंज तालुक्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आणि सिंधी समाजासह विविध जातीचे लोक जातीयवादाला थारा न देता एकोप्याने राहतात. आपल्या शहरातील एकोप्याचा परिचय देत देसाईगंजच्या कमलानगर  येथील मुस्लिम तरुणांनी देशाच्या छत्तीसगड, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून  हजारोच्या संख्येने आलेल्या दमा रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था केली.  एवढ्या मोठ्या प्रमाणात येणा-या रुग्णांसाठी एकट्या कोकडी गावाच्या भरोशावर व्यवस्था होणे शक्य नाही, ही बाब लक्षात घेता देसाईगंज येथील मुस्लिम युवकांनी या गंभीर बाबीवर विचारविनिमय करून तत्काळ वर्गणी गोळा करून जवळपास साडेतीनशे किलोचा मसाला भात तयार करून येणा-या रुग्णांना वितरित केले. 
  मृग नक्षत्राच्या पर्वावर कोकडी येथे दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात मानवतेच्या भावनेने आपणही या समाजाचे पर्यायाने देशाचे कोणीतरी घेणेदेणे लागतो,या भावनेतून सदर उपक्रमांची सुरुवात करण्यात आली असुन पुढील वर्षांपासून भोजनदान व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या तरुणांनी एकञ येऊन राबविलेल्या या उपक्रमाबाबत सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-09


Related Photos