कोकडी येथील दमा औषधीच्या कुंभमेळ्याला लाखोंची हजेरी


-  मान्यवरांच्या हस्ते औषध वितरणाचा श्रीगणेशा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकडी या गावात मृग नक्षत्राच्या पर्वावर आयुर्वेदिक दमा औषधींचा लाभ घेण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातुन जवळपास लाखो  लोकांनी हजेरी लावून औषधीचा लाभ घेतला असुन आलेल्या रुग्णांची संख्या पाहु जाता या गावाला जणु कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. औषध वितरणाचा श्रीगणेशा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
 ठरल्याप्रमाणे  काल ८ जुन रोजी सायंकाळी ६ वाजता औषध वितरणाचा श्रीगणेशा करण्यात आला.   यावेळी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, नाना महाराज मानव कल्याण सेवाधाम आश्रम परसवाडा, जिल्हा परिषद अध्यक्षा योगीता भांडेकर, माजी आमदार हरीराम वरखडे, सामाजिक कार्यकर्ते भाग्यवान खोब्रागडे,जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी,रोशनी पारधी, देसाईगंज पं.स.उपाध्यक्ष गोपाल उईके ,नगर परिषद उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, पंचायत समिती सदस्या अर्चना ढोरे, सरपंच सुधीर वाढई,  माजी सभापती परसराम टिकले,माजी सभापती दिगांबर मेश्राम, नामदेव किरसान ,नगरसेवक राजु जेठानी, नरेश विठ्ठलानी,  माजी सरपंच मन्साराम बुध्दे ,पोलीस पाटील कापगते,आनंदराव बन्सोड आदी मान्यवर प्रामुख्याने  प्रामुख्याने उपस्थित होते. 
 देसाईगंज तालुक्यातील कोकडी या गावात मागील ३८ वर्षापासून सातत्याने असाध्य अशा दमा आजारावर मृग नक्षत्राच्या पर्वावर वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या शोधित आयुर्वेदिक दमा औषध शाकाहारी रुग्णांना पाण्यातून तर मांसाहारी रुग्णांना गणी, भुरभुसा, सारंगी या जातीच्या बारीक मासोळ्यांतुन औषध  देण्यात येत असुन यासाठी कोणतेही शुल्क आकारल्या अथवा घेतल्या जात नाही.
      वैद्यकीय क्षेत्रात दमा या असाध्य आजारावर प्रभावी असे औषध अद्यापही उपलब्ध होऊ शकले नसले तरी वैद्यराज प्रल्हाद कावळे यांनी शोध लावलेल्या आयुर्वेदिक दमा औषधिचा सातत्याने तीन वर्षे सेवन केल्यास आजपर्यंत लाखो लोक या आजारातून मुक्त झाले आहेत. हमखास फायदा होत असल्याची खात्री पटल्यानेच त्यांच्या अनमोल औषधिचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्याच्या माध्यमातूनच प्रचार आणि प्रसार आपोआप होऊ लागल्याने देशाच्या कानाकोप-यातुन या औषधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचे जत्थेच्या जत्थे एक दिवसा आधीपासूनच डेरेदाखल होऊ लागल्याने या गावात औषध वितरणाचा दिवशी प्रचंड गर्दी होत असल्याचे दिसून येते.
   दरम्यान येणा-या नागरिकांची गैरसोय होऊ नये यास्तव यावर्षी प्रथमच देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने मोबाईल संडासची व्यवस्था करण्यात आली तर अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची  सोय करण्यात आली.
  तथापि एकंदरीत आलेल्या दमा रुग्णांची गैरसोय होऊ नये यास्तव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अद्यावत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती तर दरम्यान मासोळ्यांची कमतरता भासु नये यासाठी कोकडी, तुळशी व बोळधा येथील भोई समाजाच्या बांधवांनी अथक परिश्रम घेऊन आवश्यकतेनुसार मासोळ्या उपलब्ध करून देण्यात मौलिक भुमिका बजावली. लोक सहभागातुन राबवल्या जाणा-या या अलौकिक अशा उपक्रमातुन आजवर लाखो दमा रुग्णांना लाभ झाल्याने अनेक रुग्णांनी वैद्यराज प्रल्हाद कावळे यांना शाल-श्रीफळ देऊन तर त्यांच्या पत्नीला साडी चोळी देऊन त्याना सन्मानीत केले.एकुणच नागरिकांची उपस्थिती पाहु जाता दरम्यान अनुचित घटना घडु नये यास्तव देसाईगंज पोलिस विभागाच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोग्य विभागानेही चांगली आरोग्य सेवा दिली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-09


Related Photos