तामिळनाडूत हिंदी भाषेवरुन पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे


वृत्तसंस्था / तिरुचिराप्पल्ली : केंद्र सरकारच्या कार्यालावरील हिंदी भाषेतील नावावर काळे फासत ‘हिंदी हटाव’ मोहीम सुरू केल्याने तामिळनाडूत हिंदी भाषेवरुन पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दक्षिणेतील राज्यांनी नेहमीच हिंदी भाषेला विरोध दर्शवला आहे. यामुळे अनेकदा वादही झाले आहेत. तामिळनाडूत हिंदी भाषेच्या विरोधातील मोहीम पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे. शनिवारी तिरुचिराप्पल्ली परिसरात बीएसएनएल, विमानतळ तसेच अन्य काही केंद्र सरकाच्या अखत्यारीत येणाऱ्या आस्थापनांच्या कार्यालयावर लावण्यात आलेल्या बोर्डवरील हिंदी नावावर काळे फासण्याचे प्रकार घडले. या प्रकरणी विमानतळ पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
केंद्र सरकारने अलिकडेच शाळांमध्ये तीन भाषा प्रणालीचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला डीएमके आणि मक्कल नीधिमय्यमसह तामिळनाडूतील अन्य राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्यास केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
News - World | Posted : 2019-06-09