आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी : काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सूर


- लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली नसल्याचे अनेकांचे मत 
वृत्तसंस्था / मुंबई 
: लोकसभा निवडणुकीत युती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली नाही. त्यांचा कल हा भाजपकडे होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीसोबत हातमिळवणी करावी, असा सूर काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत शुक्रवारी लावला. 
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आदी नेते या बैठकीला हजर होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी आपली मते मांडली. लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात नाराजी असतानाही काँग्रेसला यश मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांची आघाडी केली खरी, परंतु आघाडी म्हणून उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ आपल्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची मदत घेतली, परंतु काँग्रेसला त्यांच्या मतदारसंघात मदत केली नाही, त्यांचा कल हा भाजपकडेच जास्त दिसत आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढविण्यात यावी, असा सूर या पदाधिकाऱ्यांनी काढला.   आगामी विधानसभेची निवडणूक ही वंचित आघाडीसोबत लढविण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केली.   Print


News - Rajy | Posted : 2019-06-08


Related Photos