गावठी दारूतून विषबाधा, बाप व मुलाचा मुत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
  मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पिता-पुत्रांची अचानक प्रकृती खालवल्याने त्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. रामा कृष्णा सोयाम वय ६० व अंकुश रामा सोयाम वय २८ दोन्ही रा. सोंडलापूर वॉर्ड करंजी (भोगे), असे मृतकांचे नाव आहे. या दोघांचा मृत्यू विषारी दारूनेच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, करंजी (भोगे) ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्राचा एक भाग असलेल्या सोंडलापूर येथील रामा कृष्णा सोयाम आणि अंकुश रामा सोयाम यांनी शुक्रवारी गावठी दारू गावात आणली. त्यानंतर दोघांनीही ती घराच्या परिसरात मनमर्जीने ढोसली. दरम्यान, रामा आणि अंकुशची प्रकृती बिघडल्याने दोघांनाही तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी अंती डॉ. ज्योत्स्ना अशोक कांबळे यांनी दोघांना मृत घोषित केले. शिवाय घटनेची माहिती पोलिसांना दिली. करंजी येथील दोघांना गावठी दारूतून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय रामा व अंकुश यांनी ज्या शिशीतील दारू सेवन केली ती शिशी व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. मृतक रामा अणि अंकुश या दोघांचे शवविच्छेदन सेवाग्राम येथील रुग्णालयातच करण्यात आले असून त्यांच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतले आहे. रामा व अंकुश याचा मृत्यू विषारी दारू सेवन केल्यानेच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांसह वैद्यकीय अधिकाऱ्या्ंकडून वर्तविला जात असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत.
 

   Print


News - Wardha | Posted : 2019-06-07


Related Photos