अहेरी, आलापल्ली आणि सिरोंचात ‘बाईकर्स’ च्या कारणाम्यांमुळे नागरीक हैराण!


- दुचाकींमध्ये बदल करून केले जात आहे ध्वनी व हवा प्रदुुषण
- सिरोंचात अल्पवयीन दुचाकीस्वारांकडून दादागिरी
- पालक, पोलिस विभागाने दखल देण्याची गरज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिरोंचा :
गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी उपविभागात ‘बाईकर्स’ च्या कारणाम्यांमुळे नागरीक मेटाकुटीस आल्याचे दिसून येत आहे. विविध कंपन्यांच्या दुचाकी खरेदी करून त्यांमध्ये पाहिजे तसा बदल करून घेत हे दुचाकीस्वार ध्वनी व हवा प्रदुषण करीत असून अल्पवयीन दुचाकीस्वार भरधाव वेगाने दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरत आहेत. सोबतच सामान्य नागरीकांना या अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या दादागिरीचा सामना करावा लागत आहे. यामुळे पोलिस विभाग तसेच पालकांनी सजग राहून आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सिरोंचा, अहेरी आणि आलापल्ली शहरातील अनेक अल्पवयीन मुलांकडे बुलेट सारख्या महागड्या दुचाकी आहेत. या दुचाकीच्या सायलेंसरमध्ये बदल करून मोठ्या आवाजात, फटाक्यांसारखा आवाज काढत हे दुचाकीस्वार रस्त्याने फिरत असतात. यामुळे रस्त्यालगतच्या नागरीकांना ध्वनी तसेच हवेतील प्रदुषणामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तब्बल एक ते दीड किलोमिटर अंतरावरूनच दुचाकींचा कर्णकर्कश आवाजात रात्री - अपरात्री घुमत असल्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत.
सिरोंचा शहरात अनेक अल्पवयीन दुचाकीस्वार बुलेटची सफारी करताना दिसून येत आहे. नुकतेच एक १६ वर्षीय दुचाकीस्वाराच्या कारणाम्यामुळे एका कारचालकाला नाहक मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मुलाने एका कारला भरधाव दुचाकी चालवून धडक दिली. यावेळी दुचाकी अनियंत्रीत होउन तो दुचाकीसह कोसळला. या मुलाने लागलीच आपल्या वडीलाला फोन करून बोलावून घेतले.  त्याच्या वडीलाने घटनास्थळ गाठून कारचालकालाच दोषी ठरवून मारहाण केली. यावेळी त्याच्या १५ हून अधिक मित्रांनीसुध्दा मारहाण करण्यासाठी सहकार्य केले. लक्ष्मण बंडावार असे कारचालकाचे नाव आहे. त्यांना जबर मारहाण करण्यात आल्यामुळे रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. बंडावार यांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सध्या पोलिस तपास करीत आहेत. विशेष म्हणजे कारचालकाची कोणतीही चूक नसताना तसेच अल्पवयीन बालकाकडे दुचाकी चालविण्याचा परवाना नसतानाही त्याच्या पालकाने कारचालकास दोषी ठरवून मारहाण केली. या प्रकरणात सध्या तक्रारकर्त्यावर दबाव टाकल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.
४ जून रोजी एका सायलेंसर नसलेल्या दुचाकीने एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने दुचाकी चालवित होता. यावेळी नागरीकांनी त्याला थांबवून समज दिली. तालुक्यातील कोत्तागुडम येथेसुध्दा एका दुचाकीस्वाराने असाच प्रकार केला. पालकांच्या दुर्लक्षीतपणामुळे तसेच लाड पूरवून पाहिजे ती गाडी घेवून दिल्या जात असल्यामुळे हेच अल्पवयीन नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या प्रकाराकडे पोलिस विभागाने गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-07


Related Photos