महत्वाच्या बातम्या

 आता रेल्वे अपघातग्रस्तांना १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेअपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आता रेल्वे अपघातात एखाद्या प्रवाशाला जीव गमवावा लागल्यास किंवा प्रवाशी जखमी झाल्यास त्याला पूर्वीपेक्षा १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार आहे.

दरम्यान, याआधी २०१२ आणि २०१३ मध्ये रेल्वेने सानुग्रह अनुदानाच्या निधीमध्ये शेवटची सुधारणा केली होती.

पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वेने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, रेल्वे अपघात आणि अनुचित घटनांमध्ये प्राण गमावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या निधीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच रेल्वेच्या प्रथमदर्शनी दायित्वामुळे मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंगवर अपघात झालेल्यांनाही अधिक भरपाई मिळणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सुधारित सानुग्रह अनुदानाची रक्कम १८ सप्टेंबरपासून लागू केली जाईल.

किती रुपये मिळतील? :

रेल्वे आणि मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना आता ५० हजार रुपयांऐवजी ५ लाख रुपये, तर गंभीर जखमींना २५ हजार रुपयांऐवजी २.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना ५ हजार रुपयांऐवजी ५० हजार रुपये मिळणार आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही अनुचित घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना, गंभीर जखमी आणि मध्यम जखमी प्रवाशांना अनुक्रमे १.५ लाख रुपये, ५० हजार रुपये आणि ५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल.

इतर सुविधा :

याचबरोबर, रेल्वेने म्हटले आहे की, रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना ३० दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल केल्यास त्यांना अतिरिक्त भरपाई मिळेल. तसेच, जखमी प्रवाशांना प्रत्येक १० दिवसांच्या कालावधीच्या शेवटी किंवा डिस्चार्जच्या तारखेला, यापैकी जे आधी असेल त्यांना दररोज ३ हजार रुपये दिले जातील. दरम्यान, रेल्वे कायदा १९८९ नुसार अपघात आणि अनुचित घटनांमध्ये प्रवाशांचा मृत्यू किंवा दुखापत झाल्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos