आरबीआयची सर्वसामान्यांना भेट : आरटीजीएस, एनईएफटी शुल्क रद्द करण्याचा घेतला निर्णय


- बँकांना मिळणार एका आठवड्यात  निर्देश 
वृत्तसंस्था / मुंबई :
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम अर्थात आरटीजीएस फंड ट्रान्सफर आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरसाठी (एनईएफटी) घेण्यात येणारे शुल्क रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बँका देखील आपल्या ग्राहकांसाठी ट्रान्झॅक्शन शुल्क कमी करण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्याच्या उद्देशाने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. 
बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटीच्या शुल्कात कपात करत या निर्णयाचा फायदा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायला हवा असे आरबीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या बाबतचे निर्देश बँकांना एका आठवड्यात मिळतील असेही आरबीआयने म्हटले आहे. आतापर्यंत आरबीआय आरटीजीएस आणि एनईएफटी शुल्क घेत आली आहे. आरबीआय रुपये २ लाख ते रुपये ५ लाखांपर्यंतच्या आरटीजीएससाठी २५ रुपयांसह टाइम वॅरिंग शुल्क घेत होती. तसेच ५ लाखांहून मोठ्या रकमेसाठी बँकेकडून ५० रुपये घेतले जात होते. बँकेकडून ८ तास ते ११ तासांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नव्हते. तर, ११ तासांपासून ते १३ तासांसाठी २ रुपये अतिरिक्त शुल्क, तसेच १३ तास ते १६.३० तासांसाठी ५ रुपये अतिरिक्त शुल्क आणि १६.३० तासांहून अधिक कालावधीसाठी १० रुपये इतके अतिरिक्त शुल्क घेतले जात होते. 
तसेच, एनईएफटीसाठी बँका १० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवर २.५० रुपये, १० हजारांहून अधिक, मात्र १ लाखापर्यंतच्या रकमेवर ५ रुपये, रुपये १ लाख ते २ लाखांपर्यंतच्या रकमेवर १५ रुपये आणि २ लाखांवरील रकमेवर २५ रुपये शुल्क आकारत होत्या.   Print


News - Rajy | Posted : 2019-06-06


Related Photos