वेकोलितील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आमदार कृष्णा खोपडे यांच्या भाच्याची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
वेकोलितील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका तरुण मूकबधिर कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय राजेश्वर देशमुख (२३) रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट वैष्णोदेवी चौक असे मृताचे नाव आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचा तो भाचा होता.
अक्षय वेकोलित कार्यरत होता. दोन महिन्यापूर्वीच तो कामाला लागला होता. अक्षय लहानपणापासूनच मूकबधिर होता. तो मंगळवारी सायंकाळी घरी आला. यानंतर अपार्टमेंटच्या छतावर निघून गेला. तिथे लिफ्टच्या स्टोअर रुममध्ये केबलच्या मदतीने गळफास घेतला. रात्री अक्षय घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. रात्री ११.४५ वाजता त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी नंदनवन पोलिसांना माहिती दिली. यासंदर्भात आ. खोपडे यांनी सांगितले की, अक्षय अतिशय हुशार मुलगा होता. त्याचे इंग्रजी अतिशय उत्तम होते. इंग्रजीतच तो ड्राफ्टींग करायचा. दोन महिन्यापूर्वीच तो वेकोलित कामाला लागला. त्याचा मोठा भाऊसुद्धा तिथेच कामाला आहे. दोघेही सोबतच ये-जा करायचे. अक्षयचा वरिष्ठ अधिकारी त्याला खूप त्रास द्यायचा. कुठलेही काम सांगायचा. एकप्र्रकारे त्याचा छळ सुरू होता. याबाबत त्याने भावाला सांगितले. त्याच्या भावाने काल मला याची कल्पनाही दिली होती. मी मुंबईत असल्याने नागपुरात आल्यावर बघतो असेही सांगितले होते. अक्षयने मृत्यूपूर्वी एक पत्रही लिहून ठेवले आहे. नंदनवन पोलिसांकडे ते सोपवण्यात आले असून त्यात त्याने कसा त्रास होता याचा उल्लेख केला असल्याचे आ. खोपडे यांनी सांगितले.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-06-06


Related Photos