अहेरी न.पं. चे मुख्याधिकारी रजेवर, नगरसेवक अमोल मुक्कावार यांचा न.पं. ला कुलूप ठोकण्याचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
स्थानिक नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मागील १० मे पासून रजेवर आहेत. यानंतर २८ मे रोजी प्रभारी मुख्याधिकारी नेमण्याचा आदेश तहसीलदारांनी काढला. मात्र अद्यापही प्रभारी मुख्याधिकारी रूजू न झाल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. यामुळे नगर पंचायतीलाच कुलूप ठोकण्याचा इशारा नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नुकताच इयत्ता बारावीचा निकाल लागला. यामुळे विद्यार्थ्यांना दाखल्यांकरीता तसेच शैक्षणिक कामांकरीता नगर पंचायतीमध्ये यावे लागत आहे. मात्र मुख्याधिकारीच नसल्यामुळे पालक तसेच विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नगर पंचायत क्षेत्रात जीवन महाराष्ट्र प्राधिकरण अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. परंतु अहेरी येथील काही प्रभागात पाईपलाईन न पोहचल्यामुळे पाणीपुरवठा होत नाही. प्रभाग क्रमांक १४ मुरूम खदान, प्रभाग क्रमांक १७ गडअहेरी, गडबामणी, प्रभाग क्रमांक १६ चेरपल्ली व काही भागात पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
१८ नोव्हेंबर २०१७ रोजी नपगर पंचायत अहेरीच्या सभेत बोरवेल मंजुरीबाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. १६ मे २०१८ व ३० ऑगस्ट २०१८ रोजी पंचायत  समिती मार्फत प्रशासकीय मान्यतेकरीता सदर प्रस्ताव पुढे पाठविण्यात आला नाही. त्यामुळे अहेरी येथील नागरीकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात आणून देवूनसुध्दा मुख्याधिकारी नसल्याने कोणताही निर्णय होउ शकलेला नाही. यामुळे तत्काळ मुख्याधिकार्यांना रूजू करावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा मुक्कावार यांनी दिला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-04


Related Photos