मालमत्ता जप्त करून दारू विक्रेत्यांकडून दंडवसुली, अहेरीच्या तहसीलदारांनी घेतला निर्णय


-  महागाव येथे दारूबंदीसाठी पेसा ग्रामसभा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी
: दारू विक्रेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत तालुक्यातील महागाव (बुद्रुक) येथील ग्रामस्थांनी काहीच दिवसांपूर्वी रात्रीला तहसीलदारांच्या उपस्थितीत तत्काळ पेसा ग्रामसभा बोलावली. दारू विक्रेत्यांना यावेळी दंडात्मक नोटीस देण्यात आली. हा दंड न भरल्यास विक्रेत्यांची मालमत्ता जप्त करून त्याद्वारे दंडाची वसुली केली जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. ग्रामपंचायतच्या या निर्णयामुळे विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.
 महागाव जवळून प्राणहिता नदी वाहन असल्याने नदीपरिसरात गुळाची गावठी दारू बनवून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचा प्रकार वाढला आहे. यात शेकडो विक्रेते सक्रीय असून नदीचे पात्र सध्या कोरडे पडल्याने सर्वत्र दारू गाळण्यास जोर चढला आहे. याचा त्रास गावकऱ्यांसह इतरांनाही सहन करावा लागत आहे. दारूमुळे परगावातील लोकांचा येथे सातत्याने राबता असतो. काहीच दिवसांपूर्वी गावातूनच दारू पिऊन जात असलेल्या दुचाकीस्वाराने एका पादचाऱ्यास उडविले. यात तो जागीच ठार झाला. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी तत्काळ ग्रामसभा घेऊन विक्रेत्यांवर २४ तास पाळत ठेवण्यासाठी दोन गट तयार करण्याचा ठराव घेतला. या गटाद्वारे पाळत ठेवून दुसऱ्याच दिवशी कपडे विक्रीच्या बहाण्याने गावातून दारू विकत घेऊन आलापल्लीला विकणाऱ्या एका इसमास रंगेहात पकडले. त्यामुळे गाव संघटनेद्वारे मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता आणि तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्या उपस्थितीत लगेच दुसरी पेसा ग्रामसभा बोलावली.
यावेळी दारूविक्री करणाऱ्यांना १० हजार रुपये दंड भरण्याबाबत नोटीस देण्यात आली. दंड ठरलेल्या कालावधीत न भरल्यास तहसील कार्यालयाद्वारे थेट ५० हजार रुपये दंड आकाराला जाणार असून तो न भरल्यास तहसील कार्यालयाद्वारे विक्रेत्याची मालमत्ता जप्त करून दंडाची वसुली केली जाणार असल्याचे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी ग्रामसभेत सांगितले. या निर्णयामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. ग्रामसभेला सरपंच विनायक देलाडी, उपसरपंच मारोती करमे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय अलोनी आणि पोलीस पाटील कल्पना दुर्गे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-04


Related Photos