२०१८-१९ मध्ये विविध बँकांमध्ये तब्बल ७१ हजार ५०० कोटींचा घोटाळा , रिझर्व्ह बँकेची माहिती


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :    २०१८-१९ मध्ये विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या सहा हजार ८०० प्रकरणांची नोंद झाली व या घोटाळ्यांचा आकडा तब्बल ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला, अशी धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने सोमवारी दिली.  एका पत्रकाराने माहिती अधिकारांतर्गत या विषयी माहितीची विचारणा केली होती. व्यावसायिक बँका व निवडक वित्तीय संस्थांमध्ये मिळून गेल्या आर्थिक वर्षात ७१ हजार ५४२.९३ कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या घोटाळ्यांत ७३ टक्क्यांनी वाढ झाली, असे आरबीआयच्या उत्तरात म्हटले आहे. 
२०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांमध्ये ४१ हजार १६७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला. तसेच, त्यावेळी गैरव्यवहाराची ५ हजार ९१६ प्रकरणे घडली होती. गेल्या ११ आर्थिक वर्षांचा विचार केल्यास या कालावधीमध्ये बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या तब्बल ५३ हजार ३३४ प्रकरणांची नोंद झाली आहे. या घोटाळ्यांची एकूण व्याप्ती २.०५ लाख कोटी रुपये एवढी प्रचंड आहे. 
सीबीआयने गेल्या आर्थिक वर्षात दोन सरकारी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. आयडीबीआय बँकेतील ६०० कोटी रुपयांच्या कर्जघोटाळा प्रकरणात सीबीआयने या बँकेचे माजी सीएमडी सी. शिवशंकरन यांच्यासह १५ अधिकाऱ्यांवर कारवाई केली. दागिने व जडजवाहर, चेकमधील अफरातफर, आयटी विभाग, निर्यातीसंबंधी व्यवहार, मुदत ठेवी, मागणी कर्जे, संमतीपत्र आदी विविध १३ विभागांत आर्थिक घोटाळ्यांचे प्रकार घडले आहेत.   Print


News - World | Posted : 2019-06-04


Related Photos