पवनी तालुक्यातील कृषि केंद्रावर भरारी पथकाची धाड , ९६.६९ लाख रुपयांच्या कृषि निविष्ठा विक्री बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
कृषि विभाग गुणवत्ता नियंत्रण, जिल्हा भरारी पथक, भंडारा व तालुका भरारी पथक पवनी यांनी संयुक्तपणे कृषि केंद्र विक्री केंद्रांची तपासणी मोहिम राबवून भात बियाणे ४१० क्विंटल, रासायनिक खते ३८७ मे.टन व किटकनाशके २२० लिटर एकूण ९६.६९ लाख रकमेच्या कृषि निवेष्टेस विक्री बंद आदेश दिले आहेत. जिल्हा भरारी पथक अचानकपणे कोणत्याही कृषि केंद्रात धाड टाकत असल्यामुळे बियाणे, खते व किटकनाशके कायद्याचे पालन करण्यास कुचराई करणाऱ्या कृषि केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत. 
भंडारा जिल्ह्यात कृषि केंद्र तपासणी मोहिम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनात राबविण्यात आली असून उपविभागीय अधिकारी मिलींद लाड,जिल्हा गुणवत्ता निरीक्षक प्रदीप म्हसकर,तंत्र अधिकारी एस.एन. गायधने, तालुका कृषि अधिकारी पवनी अविनाश कोटांगळे यांनी संयुक्तपणे भरारी पथकाची कार्यवाही केली.
या भरारी पथकाने गुणवत्ता विषयक बियाणे, खते व किटकनाशके अधिनियमाच्या तरतूदीचे पालन न करणाऱ्या कृषि केंद्र धारकांवर धडक कार्यवाही केली आहे. यामध्ये पवनी तालुक्यात गुरुदेव कृषि केंद्र आसगाव यांचे दुकानात न्युझिविडू सिडस लि, दप्तरी ॲग्रो प्रा.लि., यशोदा हायब्रीड सिडस प्रा.लि. रायझिंगसन सिडस या कंपनीचे बियाणे साठा पुस्तकात नोंदविले नाही आणि साठा व दर फलक अद्यावत केला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या ४१० क्विंटल बियाण्यास त्रुटींची सुधारणा करण्यासाठी विक्री बंद आदेश देण्यात आले. 
पवनी तालुक्यात गुरुदेव कृषि केंद्र आसगाव, श्री. सदगुरु कृषि केंद्र वलनी या खत विक्री केंद्राची तपासणी केली असता साठा व दर फलक अद्यावत नसणे, खतांची खरेदी बिले उपलब्ध नसणे, पॉस मशिन बंद असणे, खतांचा साठा अवास्तव असणे, साठा पुस्तक अद्यावत नसणे, दुकानाचे नावाचा बोर्ड नसणे या उणिवा आढळल्यामुळे पारसेवार ॲग्रो, असर.सी.एफ., एम.अे.आय.डी.सी., आय.पी.एल, कोरोमंडळ इंटरनॅशलन लि, शिवा फर्टीलायर्झर, बसंत ॲग्रोटेक, इफको, स्मार्टकेम टेक्नॉलाजी, रामा फॉस्फेट, कस्तूरचंद १५:१५:१५, बायोफर्टीलायझर इत्यादी विविध ३८७ मे. टन खत साठयास विक्री बंद आदेश दिले आहेत. यासह स्वतीक कृषि केंद्र कुर्झा या किटकनाशके विक्री केंद्रात साठा पुस्तक अद्यावत नसणे, साठा व दर फलक अद्यावत नसणे, खरेदी बिले व विक्री बिले उपलब्ध नसणे यासाठी ग्लायसील या तणनाशकास विक्री बंद आदेश दिले आहेत. 
यापुढेही शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण किफायतशिर दरात निविष्ठा उपलबध होण्यासाठी जिल्हयातील भरारी पथकाची तपासणी मोहिम अधिक तीव्र करुन गुणवत्ता विषयक बियाणे, खते व किटकनाशके कायदयाने उल्लंघन करणाऱ्या कंपन्या व कृषि केंद्र धारकांना भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण  यांनी दिली.    Print


News - Bhandara | Posted : 2019-06-03


Related Photos