महत्वाच्या बातम्या

 कश्मीरात दहशतवादी हल्ला : कर्नल व मेजरसह डीएसपी शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / जम्मू-कश्मीर : जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. अनंतनाग जिह्यात दहशतवाद्यांबरोबर सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष ढोनक आणि पोलीस उपअधीक्षक हुमायून भट हे शहीद झाले आहेत.

दक्षिण कश्मीरातील अनंतनाग जिह्यातील कोकरनाग परिसरातील गडूलच्या घनदाट जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मंगळवारी मिळाली. १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंह यांच्या नेतृत्वाखाली लष्करी जवान आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले. रात्रभर सर्च ऑपरेशन सुरू होते. बुधवारी सकाळी दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली. जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या वेळी चकमकीत कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष ढोनक आणि पोलीस उपअधीक्षक हुमायून भट हे गंभीर जखमी झाले. तिघांना तत्काळ श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिघे शहीद झाले. चकमकीची माहिती मिळताच लेफ्टनंट जनरल राजीव घाई आणि पोलीस महानिरीक्षक दिलबाग सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, लष्करी जवान आणि पोलीस पथकाकडून दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. घनदाट जंगलात ४ ते ५ दहशतवादी लपल्याची माहिती आहे.

तोयबाच्या शॉडो ग्रुपचे दहशतवादी - बंदी घातलेल्या रिसिस्टन्स प्रंट या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हा शॉडो ग्रुप आहे. यापूर्वी ४ ऑगस्ट रोजी कुलगाम जिह्यात याच ग्रुपच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात तीन जवान शहीद झाले होते.

मनप्रीत सिंग हे धाडशी अधिकारी - कर्नल मनप्रीत सिंग हे अत्यंत धाडशी लष्करी अधिकारी होते. १९ राष्ट्रीय रायफल्सचे ते कमांडिंग ऑफिसर होते. २०२१ मध्ये त्यांना सेना पदकाने गौरविण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षक हुमायून भट हे २०१८ मध्ये जम्मू-कश्मीर पोलीस दलात भर्ती झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन महिन्यांची मुलगी आहे. त्यांचे वडील गुलाम हसन भट हे याच वर्षी पोलीस महानिरीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत.

राजौरीत लष्कराच्या श्वानाने हँडलरचे प्राण वाचवले - राजौरी जिह्यात दहशतवाद्यांबरोबर मंगळवरी सुरू असलेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. या वेळी एका दशहतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या ऑपरेशनमध्ये लष्कराचे श्वान पथकही होते. केंट नावाच्या श्वानाने स्वतःचा जीव धोक्यात घालून अपल्या हँडलरचे प्राण वाचवले. या चकमकीत केंट शहीद झाला.

पाकिस्तानची घुसखोरी सुरूच : सरकारचा दावा फोल - जम्मू-कश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी दहशतवादी पाठवण्याचे काम पाकिस्तानकडून राजरोसपणे केले जात आहे. हिंदुस्थानात घुसखोरी करण्यासाठी दहशतवादी नेपाळ आणि पंजाबमार्गे येत आहेत, असे विधान लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडिंग इन चिफ लेफ्टनंट जनरल उकेंद्र द्विवेदी यांनी आज केले. कश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तान कट्टरपंथी बंदुकधाऱ्याना घुसखोरीसाठी पाठवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पाकिस्तानचा कुहेतू कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असेही उकेंद्र द्विवेदी म्हणाले. द्विवेदी यांच्या या विधानामुळे घुसखोरीबाबतचे सरकारचे दावे फोल ठरलेत.





  Print






News - World




Related Photos