महत्वाच्या बातम्या

 प्रत्येक घरातून होणार माती अथवा तांदूळ संकलित : माझी माती माझा देश अभियानाचा दुसरा टप्पा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियानाचा दुसरा टप्पा १ सेप्टेंबरपासुन सुरु झाला असुन याअंतर्गत देशस्तरावर अमृत कलश यात्रा काढली जाणार असुन प्रत्येक जिल्ह्यातुन अमृत कलश राजधानी दिल्ली येथे पाठविला जाणार आहे. 

प्रत्यके भारतवासीयांचा यात सहभाग असावा यादृष्टीने प्रत्येक घरातुन माती अथवा तांदुळ संकलित करून अमृत कलशात भरली जाणार आहे. याकरीता चंद्रपूर महानगरपालीकेतर्फे अमृत कलश रथ तयार करण्यात आले असुन त्याद्वारे शहरातील प्रत्येक घरातुन माती अथवा तांदुळ संकलित केले जाणार आहे. तसेच पंचप्रण शपथ सुद्धा घेण्यात येणार आहे. ही मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत चालणार असुन प्रत्येक घरातील, प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक विद्यार्थ्याचा यात सहभाग असावा या दृष्टीने मनपाद्वारे नियोजन केले गेले  आहे.  

मेरी माटी मेरा देशचा पहिला भाग यशस्वीरित्या पूर्ण झाला असुन यात वीरांच्या नावाचे फलक लावण्यात आले, वसुधा वंदन अंतर्गत रोपे लावण्यात आली, पंचप्रण शपथही घेण्यात आली. आता या मोहीमेचा दुसरा भाग सुरू झाला असुन यात आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात माती किंवा तांदूळ १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक घरातून, वार्डातून गोळा केले जाणार आहेत.  

सर्व संकलित माती व तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशात ठेवण्यात येणार आहेत. यावेळी शहरातील सांस्कृतिक संस्था, एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईड्सचे विद्यार्थी या मोहीमेत सहभागी होणार आहेत तसेच देशासाठी लढा देणाऱ्या आणि आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैनिक, पोलिस, स्वातंत्र्यसैनिक किंवा शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान सुद्धा केला जाणार आहे.

२२ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत हे सर्व कलश मुंबईत एकत्र आणण्यात येणार आहेत. हे अमृत कलश २७ ऑक्टोबर रोजी मुंबईहून विशेष ट्रेनने दिल्लीला पाठवण्यात येणार आहेत. त्यावेळी मोठा सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर हे कलश २८ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत देशाच्या राजधानीत रेल्वेने पाठवल्या जातील. या कलशांची माती १ नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मारकाजवळ अमृत वाटिके मध्ये विसर्जित केली जाणार आहे.

या अभियानात आपल्या घरातील माती अथवा तांदुळ अमृत कलश रथ यातील अमृत कलशात देऊन राष्ट्रव्यापी अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos