जागतिक तंबाखू विरोधदिनी पालकमंत्री ना. आत्राम यांच्याहते चित्ररथाचे उद्घाटन


-  मुक्तिपथचा उपक्रम : व्हिडीओ व्हॅनद्वारे व्यसनमुक्तीवर करणार जनजागृती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून ३१ मे रोजी पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. मुक्तिपथच्या माध्यमातून या चित्ररथाद्वारे व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जाणार आहे.    
  गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी २०१६ पासून राज्य शासन आणि सर्च संस्थेच्या माध्यमातून मुक्तिपथ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाराही  तालुक्यातील १५०० गावांमध्ये मुक्तिपथ तालुका चमुद्वारे विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून चित्ररथ म्हणजेच व्हिडीओ व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे. तंबाखू सेवनाद्वारे होणारे दुष्परिणाम सांगणारा यमराजाचा फास हा चित्रपट या व्हिडीओ व्हॅन द्वारे गावागावात दाखवून जाणीव जागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर गावाची दारू बंद करण्यासाठी लोक काय करू शकतात, व्यसन सोडविण्यासाठी कशा पद्धतीने उपचार घेता येतात याची माहिती देखील या चित्ररथाद्वारे दिली जाणार आहे. संदेशाबरोबरच गाव संघटन आणखी बळकट करणे, गावात व्यसन जनजागृतीचे संदेश लावणे असे या उपक्रमाचे स्वरूप असणार आहे.
जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून हा चित्ररथ लोकार्पित करण्यात आला. यावेळी आ. कृष्णा गजबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-01


Related Photos