पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला शहिदांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा पहिला आणि महत्त्वपूर्ण निर्णय


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहिदांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा पहिला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे ट्विटही मोदी यांनी केले आहे. आमच्या नव्या सरकारचा पहिला निर्णय देशाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी समर्पित करतो, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. 
नॅशनल डिफेन्स फंडात मोठे फेरबदल करून दहशतवादी आणि माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुलांची स्कॉलरशीप दरमहा २ हजार रुपयांवरून २ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर मुलींची स्कॉलरशीप २ हजार २५० रुपयांवरून ३ हजार रुपये करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदींनी स्कॉलरशीप वाढीच्या फाइलवर सही केली. याशिवाय केंद्रीय सशस्त्र दलातील शहीद जवानांच्या मुलांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार केला आहे. त्यानुसार राज्यांतील शहीद पोलिसांच्या मुलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. नक्षलवादी आणि दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुलांचा शिष्यवृत्ती योजनेत समावेश केला आहे. या योजनेतंर्गत दर महिन्याला देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्येही वाढ केली आहे. राष्ट्रीय संरक्षण निधी अंतर्गत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत बदलांना मंजुरी दिली आहे.  Print


News - World | Posted : 2019-05-31


Related Photos