महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत २ हजार ३३६ प्रकरणे निकाली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात ९ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २ हजार ३३६ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.

सदर लोक अदालतीत प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे एकूण  ८ हजार ९२९ व दाखल पूर्व प्रकरणे १५ हजार ९७९ अशी एकूण २४ हजार ९०८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यासाठी एकूण २८ पॅनल तयार करण्यात आले होते. त्यापैकी प्रलंबित न्यायालयीन १ हजार ४४३ प्रकरणे तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी ८९३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे २० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम २ कोटी ९६ लक्ष ८२ हजार रुपये वसूल करण्यात आले. उपरोक्त प्रकरणांपैकी सर्वात जास्त नुकसान भरपाई रुपये ८६ लक्ष एका प्रकरणात मंजूर करण्यात आले. भूसंपादनाची ७४ प्रकरणी ठेवण्यात आली, त्यापैकी सहा प्रकरणे निकाली करण्यात आली असून मोबदल्याची रक्कम रुपये २६ लक्ष ३ हजार १९१ अदा करण्यात आली. कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये ३२ प्रकरणे निकाली करण्यात आली, त्यापैकी ६ प्रकरणात पक्षकारांनी एकत्र राहण्याच्या समजुतीने निर्णय घेतला. धनादेश अनादरीत होणाऱ्या प्रकरणात ९६ प्रकरणे तर कामगार व औद्योगिक न्यायालयातील ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोकअदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.





  Print






News - Chandrapur




Related Photos