भामरागड तालुक्यात चक्रीवादळाचा कहर , झाडे कोसळली,टिनपत्रे उडाली, वीजपुरवठा खंडित


- अनेकांचे आर्थिक नुकसान.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यात बुधवार २९ मे  रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता प्रचंड चक्रीवादळ आले. यात ठिकठिकाणी अनेक झाडे कोसळली. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे व कवेलू उडाले तर काही घरांवर झाडे कोसळून अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. सदर चक्रीवादळाचा कहर तब्बल एक तास सुरु होता.
 बुधवारला भामरागडचा आठवडी बाजार होता. काही भागातील तेंदुपाने तोडाईचे पैसे मिळाल्यामुळे बाजार बऱ्यांपैकी भरला होता. अशातच सायंकाळी सहा वाजतापासून आकाशात ढग दाटून आले व वादळ वाऱ्याला सुरुवात झाली. त्यामुळे बाजारातील विक्रेत्यांनी दुकाने गुंडाळली. ग्राहकांची पांगापांग झाली. लोकांनी मिळेल त्या साधनांनी गावाकडचा रस्ता धरला.७.१५ वाजता अचानक चक्रीवादळ सुरू झाले व वादळवाऱ्यांसह पाऊस कोसळायला लागला.विजांचा चमचमाट,ढगांचा गडगडाट सुरू झाला. वीज गेली. झाडे कोसळायला लागली. घरांवरील टिनपत्रे उडू लागले.लोक भयभित झाले. जिवाच्या आकांताने आसरा शोधू लागले. चक्रीवादळाचा असा हा कहर तब्बल एक तास सुरू होता. वीजेअभावी व भितीमुळे  नागरिकांची झोप उडाली.
  दुसऱ्या दिवशी आज गुरुवारी सकाळी जिकडेतिकडे भयाण दृश्य पाहायला मिळाले. सर्वत्र झाडे कोसळली होती. अनेकांच्या घरांवरील टिनपत्रे व कवेलू उडाली होती. काहींच्या घरांवर झाडे कोसळली होती.रस्त्यावरील विजेचे खांब झुकले होते तर अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. ठिकठिकाणी चक्रीवादळाचीच चर्चा सुरू होती. तालुक्यातील कोयनगुडा,बेजूर,टेकला कुमरगुडा,मेडपल्ली,धोडराज,झारेगुडा,गोलागुडा,आरेवाडा,हिदुर,ताडगाव,कियर,कोठी इत्यादी गावाला जाणाऱ्या रस्त्यांवर झाडे कोसळली होती. अनेक गावांतील घरांवर   झाडे कोसळल्यामुळे तसेच टिनपत्रे व कवेलू उडाल्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले; त्यामुळे प्रशासनानी याची गंभीर दखल घेऊन नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-30


Related Photos