येंगलखेडा येथील आदिवासी विविध सहकारी सोसायटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर


- शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप
- अधिकाऱ्यांनी भेट देवून जाणून घेतली परिस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
कोरची उपप्रादेशिक विभागांतर्गत येत असलेल्या कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुटमार केली जात असून यामध्ये संचालक मंडळासह व्यावस्थापकांचे साटेलोटे असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी करीत आक्रमक पवित्रा घेतला. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामुळे उपविभागीय अधिकारी तसेच प्रादेशिक व्यवस्थापकांनी धान खरेदी केंद्रास भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
येंगलखेडा येथे आदिवासी कार्यकारी सोसायटीमध्ये २३ मे पासून धान खरेदी करण्यात येत आहे. येंगलखेडा, सावरगाव, नेहारपायली, आंबेझरी, नडीकसा, चिचेवाडा, बोरटोला, बांधगाव, चांदोना, आंधळी येथील शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणतात. खरेदी केंद्रावर काट्यामध्ये फरक असल्याचे शेतकरी सांगत असताना त्यांच्या मताची कोणतीही दखल न घेता व्यवस्थापक व्ही.एफ. हटवार हे उर्मट भाषेत उत्तर देत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. नियमानुसार धान विक्री करायची असेल तर करा अन्यथा घरी घेवून जा, असे उत्तर त्यांनी दिले. 
काल २८ मे रोजी सकाळी परिसरातील शेतकरी आदिवासी कार्यकारी सोसायटी येंगलखेडा येथे होत असलेल्या प्रकाराची चौकशी केली.  नियमानुसार दहा टक्क्यांच्या आत ओलावा असल्यास तंतोतंत मोजमापाने इलेक्ट्रिक वजनकाटा लावून धान्य खरेदी करण्यात येते. जर १५ टक्क्यांच्या आतमध्ये ओलावा असेल तर ४० किलो कट्ट्यामागे एक किलो धान्य शेतकऱ्यांच्या कट्ट्यामागे म्हणजेच ४१ किलो वजनाचे धान खरेदी करण्याचे निकष संचालक मंडळाने ठरविले होते.  यावेळी प्रत्यक्ष मोजमाप केलेले धान्य शेतकरी व व्यवस्थापकासह संचालक मंडळासमोर मोजमाप केले असता ४४ किलो ३०० ग्रॅम भरले. यामध्ये संस्थेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या तुटीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरूध्द उपविभागीय कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केले. 
निवेदन देताना गोपाल आत्राम, देविदास भैसा, लयलुजी कसनकर, किशोर निकुरे, बारसु नरोटे, माणिक उईके, शंकर ताडाम, सुधाकर किरणापुरे, टिकाराम दहिकर, रेमाजी किरणापुरे, राजेंद्र कसनकर, रामदास आडुलवार, कृष्णा कसनकर, माणिक उईके, देवेंद्र कसनकर, शंकर ताराम, मंगेश आत्राम, लिलाधर बारसागडे, ब्रिजलाल कसनकर, शिवलाल रक्षा, महेश केरामी उपस्थित होते.
याबाबत व्यवस्थापक हटवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, १४ ते १५ टक्के ओलावा असल्यास आम्ही धान्य ४० किलो च्या भरतीसाठी एक किलो अधिक धान्य घेतो. दहा टक्के ओलावास असेल तर ४० किलो वजनाने मोजमाप करतो. ओलावा जास्त असल्याचे सांगितल्यास शेतकरी ऐकून घेत नाहीत. झालेल्या प्रकाराविषयी मी वजन काट्याकडे बघितले नाही, असे ते म्हणाले.
सभापती दिलीप केवळराम चुरगाये यांच्याशी बोलले असता ते म्हणाले, शेतकऱ्यांची झालेली नुकसानभरपाई आपण देण्यास तयार आहोत. शेतकऱ्यांनी समझोता करून तक्रार मागे घ्यावी, या प्रकाराबाबत खेद व्यक्त करीत असल्याचे ते म्हणाले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-29


Related Photos