अमरावतीचा कबीर माखिजा विदर्भातून टॉपर : पहा कोणत्या जिल्ह्यात कोण मारली बाजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इय्यता बारावीच्या परीक्षेचा निकाल काल २८ मे रोजी  जाहीर करण्यात आला. यामध्ये विदर्भातून अमरावती येथील श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा कबीर संजय माखिजा याने ९७.३८ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेतून विदर्भात पहिला येण्याचा बहुमान पटकाविला. तर नागपूर येथील इशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करत विज्ञान शाखेतून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातून प्रत्यय उराडे प्रथम तर प्रणय परतवार द्वितीय 

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर झाला. त्यात गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे. जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी अवघी ६८.८० टक्के आहे. गडचिरोलीतील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रत्यय उराडे याने ९२.१५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तर प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या प्रणय परतवार आणि पियुष म्हस्के यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले आहे.
केवळ पाच महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. २०१७ मध्ये जिल्ह्यात बारावीच्या निकालाची टक्केवारी ८५.५७ एवढी होती. २०१८ मध्ये हा निकाल जवळपास पाच टक्क्यांनी घटून ८०.९८ टक्क्यांवर आला. यावर्षी (२०१९) हा निकाल तब्बल १२ टक्क्यांनी घसरून ६८.८० टक्क्यांवर आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातून ओंकार मधुकर कुनवटकर प्रथम 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८०.८९ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून वरोरा हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयातील ओंकार मधुकर कुनवटकर हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी ९४.९२ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आला आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी प्रणित गिरडकर हा ९३.०७ टक्के घेऊन द्वितीय आला आहे. तर ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी तनया राजेश गेडाम ही ९२.६१ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २८ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २८ हजार ६१८ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामधील २३ हजार १४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ६८८ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.
पाच हजार ८०९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १४ हजार ९९४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर एक हजार ६५८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल पाचव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची टक्केवारी घसरली आहे.

नागपुरातून  इशिका सतिजा  ९६.३१ टक्के  गुण प्राप्त करत अव्वल

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. यंदा विभागाची आठव्या स्थानावरून अखेरच्या स्थानावर घसरण झाली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८२.५१ टक्के इतकी आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपुरातील के.डी.एम.गर्ल्स कॉलेजमधील विद्यार्थिनी इशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तिच्यापाठोपाठ डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दायमा हिने ९६ टक्के (६२४) गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण ढुमणे हा ९५.५३ टक्के (६२१) गुण प्राप्त करत तृतीय स्थानावर राहिला. 

राधिका तापडिया व सिमरन थदानी  वर्धा जिल्ह्यातून संयुक्तरित्या  प्रथम

वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीच केली आहे. वर्धा शहरातील गो.से. वाणिज्य महाविद्यालयाच्या राधिका तापडिया व सिमरन थदानी यांनी समान टक्के गुण संपादीत करून जिल्ह्यातून प्रथम आल्या आहेत. त्यांनी ९६.४७ टक्के गुण संपादीत केले आहे. तर गो. से. वाणिज्य महाविद्यालयातीलच अभिषेक झोडे यांने ९५.६९ टक्के तर चित्रिका गेलानी हिने ९५.५४ टक्के गुण संपादित करून अनुक्रमे जिल्ह्यातून द्वितीय व तृतीय स्थानी राहिले.

अमरावती जिल्ह्यात  वाणिज्य शाखेने विज्ञान आणि कला शाखेला टाकले मागे 

अमरावती : इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी संकेत स्थळावर जाहीर झाला. यात स्थानिक श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या कबीर संजय माखिजा याने ९७.३८ टक्के मिळवून वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात टॉपर येण्याचा बहुमान पटकाविला. याच महाविद्यालयातील श्रद्धा राजेश चांडक ९७.०८, तृष्णा बुरघाटे ९६.९२ टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे द्वितीय, तृतीय स्थानी झळकले. यंदा बारावीच्या निकालात वाणिज्य शाखेने विज्ञान आणि कला शाखेला गुणवत्तेत धोबीपछाड दिला.
शहरातील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील आंचल मनोहर कश्यप व गौरी अमित गुप्ता या दोघीही समान ९३.५४ टक्के मिळवित विज्ञान शाखेतून अव्वल आल्या आहेत. त्यापाठोपाठ श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा प्रज्वल साळुंके याने ९३.०८ टक्केवारी मिळविली.
अमरावती जिल्ह्यात ४०० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यात १५ कनिष्ठ महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. 

नूतन कन्या शाळेची खुशी संतोष गंगवानी भंडारा  जिल्ह्यातून प्रथम

भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागातून द्वितीय क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा निकाल ८४.५५ टक्के असून भंडारा येथील नूतन कन्या शाळेची खुशी संतोष गंगवानी ही जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला. ती वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी असून तिला ९६.४६ टक्के गुण मिळाले आहेत. जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान येथीलच लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचा चिन्मय अनिल नवलाखे प्राप्त केला. त्याला ९५.६९ टक्के गुण मिळाले आहेत.
जिल्ह्यातून भंडारा तालुका ९०.२० टक्के निकाल घेऊन आघाडीवर आहे. विशेष म्हणजे मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी ६.८८ इतकी जास्त आहे.

सिया  ठाकूर ९५.८४ टक्के गुण घेऊन गोंदिया जिल्ह्यातून अव्वल

गोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला.यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा प्रथम आला असून जिल्ह्यातील ८७.९९ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. गोंदिया येथील शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिया धनेंद्र ठाकूर हिने सर्वाधिक ९५.८४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे. तर याच विद्यालयाचा विद्यार्थी श्रीपाद विजय देशपांडे हा ९५.४० टक्के गुण घेऊन उर्तीण झाला. तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल जितेंद्र साखरे ९५.३८ टक्के गुण प्राप्त केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-29


Related Photos