महत्वाच्या बातम्या

 नागपूर : एचआयव्ही एडस ची नाटकातून जनजागृती


- रेड रिबन क्लब जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन

- शहरातील १६ महाविद्यालयांचा सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : युवा वर्गामध्ये एड्सविषयी जागृती करण्यासाठी रेड रिबन क्लब जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन नुकतेच वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत करण्यात आले. यात नागपुरातील १६ महाविद्यालयांचा सहभाग होता.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नागपूर, जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नाट्य स्पर्धेचे उद्घाटन आरोग्य सेवेच्या उपसंचालक डॉ. कांचन वानेरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.  निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा घेण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, क्षयरोग अधिकारी डॉ शिल्पा जिचकार, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

नाट्य स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट अभिनय व भाषेचा वापर करून एड्स जनजागृतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला. युवा वर्ग हा सृजनशील असल्यामुळे विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यात जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात युथ फेस्टिव्हल साजरा करण्यात आला. या अनुषंगाने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नाट्य स्पर्धेचे परीक्षण पुष्पक भट, संजय बन्सोड, लता जिकार यांनी केले. ज्ञान, सादरीकरण, कालावधी, संदेश, संसाधने, नाटकातील कलाकारांची संख्या या आधारावर गुणांकन करण्यात आले. यात प्रथम क्रमांक वसंतराव महिला राज्य कला व समाज विज्ञान संस्था, द्वितीय क्रमांक हिस्लॅाप महाविद्यालय, तृतीय क्रमांक एलएडी महाविद्यालय शंकर नगर यांनी पटकावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील कलांवतांचे सादरीकरण दर्जेदार असल्यामुळे त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.            





  Print






News - Nagpur




Related Photos