महत्वाच्या बातम्या

 तलाव व विहिरी सुकल्या : राज्यातील २२ जिल्हे कोरडेठाक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : हवामान विभागाचे हवा बाण मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही फेल ठरले असून राज्यात २२ हून अधिक जिल्हे कोरडेठाक पडल्याचे समोर आले आहे. विहिरी सुकल्या असून पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागातही उस करपून गेला आहे.

तर नाशिक, जुन्नरसह मराठवाडा, विदर्भात सोयाबीनची फुले झडून गेल्याने यंदा शेतीत प्रचंड नुकसान होण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी भागभांडवल पुन्हा उभे करावे लागणार आहे. तर आधीच डोंगराएवढे कर्ज झाल्याने एकटय़ा विदर्भात वर्षभरात तब्बल १ हजार ५६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

येणाऱ्या काळात अवघ्या महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे हवामान आणि कृषीतज्ञांनी म्हटले आहे. गेल्या दहा ते १२ वर्षांत महाराष्ट्राला चौथ्यांदा दुष्काळ पाहावा लागणार असल्याचे हवामान व कृषीतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. बळीराजा यात सर्वाधिक भरडला जाणार आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागेल, असे डॉ. साबळे म्हणाले.

दोन दिवसांत समाधानकारक पाऊस -

येत्या दोन दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून व्यक्त केला आहे.

तीन ते चार एकरामागे दोन लाखांचे नुकसान -

यंदा पावसाने ओढ दिल्याचा फटका पश्चिम महाराष्ट्रालाही बसला आहे. वडूजपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपूजसह विविध गावांमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. माण, खटाव तालुक्यात उस करपून गेला असून यंदा शेतकऱ्यांना तीन ते चार एकरामागे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे येथील शेतकरी महादेव जाधव यांनी सांगितले.

हे जिल्हे दुष्काळाच्या छायेत -

धाराशीव, परभणी, बुलढाणा, धुळे आणि नांदेड, सोलापूर, सातारा, बीड, नगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, हिंगोली, सांगली, जालना आणि गोंदिया हे जिल्हे दुष्काळाच्या छायेत आहेत. यात आणखी चार ते पाच जिह्यांचा समावेश होईल, असे हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.





  Print






News - Rajy




Related Photos