'नानां' चा घुमजाव, ती घोषणा राजकीय जुमलेबाजी


- राजकीय संन्यास घेणार नाही : पटोले 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी /  नागपूर :
एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत भाजपचे नेते गिरीश महाजन याना  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातून निवडून आल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ, असे जाहीर आव्हान देणारे करणारे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तसेच नागपुरातील उमेदवार नाना पटोले यांनी घूमजाव करत आपली ती घोषणा राजकीय जुमलेबाजी होती, अशी कबुली दिली. आपण राजकीय संन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट केले. 
नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांचा २ लाख १६ हजार मतांनी पराभव केला.  यानंतर पटोले यांनी   ईव्हीएम आणि निवडणूक प्रशासनाला दोष दिला. आम्ही तुम्हाला मते दिली, असे अनेक लोक मला विचारत होते. त्यांची मते गेली तरी कुठे हा प्रश्न मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे ईव्हीएमबाबत मनात संशय कायम आहे. आम्ही ईव्हीएम व नागपुरातील निवडणूक प्रशासनाबाबत पहिल्या दिवसापासून तक्रारी करीत होतो. आतापर्यंत आम्ही ५३ तक्रारी केल्या आहेत. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भूमिकेत असलेले जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पक्षपाती भूमिका पार पाडली. याबाबतचे सर्व पुरावे काँग्रेसच्या लिगल सेलकडे दिले असून जिल्हाधिकारी मुद्गल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे पटोले यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने तुम्ही जबाबदारी स्वीकारणार काय, या प्रश्नावर पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्याची तयारी असल्याचे पटोले म्हणाले.  नागपुरात गुन्हेगारी, पाणी आणि प्रदूषणाची समस्या आहे. यावर विरोधी पक्ष म्हणून आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-28


Related Photos