जिंजगाव येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या साधना विद्यालयाचे उद्घाटन व प्रवेश दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड  :
तालुक्यातील दुर्गम अशा जिंजगाव येथे महारोगी सेवा समिती आनंदवन,वरोरा द्वारा संचालित व लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसातर्फे व्यवस्थापित साधना विद्यालयाची स्थापना ५ मे २०१९ ला करण्यात आली.  या विद्यालयाचे    उद्घाटन सोहळा व शाळा प्रवेश दिन आज २७ मे रोजी   मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  याप्रसंगी  कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक   अनिकेत आमटे  होते. उद्घाटन जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. सौ.मंदाकिनी आमटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी साधनाताई आमटेंच्या कन्या  रेणुका मनोहर ,नागेपल्ली प्रकल्पाचे प्रमुख जगन  मचकले, जिंजगावचे शेतीनिष्ठ शेतकरी सिताराम मडावी,डॉ. दिगंत आमटे,डॉ. सौ.अनघा आमटे,नागपूरचे न्युरालाजिस्ट डॉ. वैभव करंदीकर,जिंजगावचे पोलीस पाटील संतू पेंटा मडावी, नागपूरचे जितू नायक, पं.स.सदस्य इंदरशाह मडावी, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, प्रतिष्ठीत नागरिक लक्ष्मन मडावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 गत ४ वर्षांपासून लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसातर्फे ६७२ लोकसंख्या व ९० घरांची वस्ती जिंजगावचा विकास सुरु आहे. सर्वप्रथम येथील माजी मालगुजारी तलावाचे खोलीकरण, ३५ हजार  लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व प्रत्येक घरी नळजोडणी, शौचालय बांधकाम, आगळ्यावेगळ्या प्रकारचे समाजमंदीर बांधकाम असे विविध विकासकामे करण्यात आले. जिंजगावचा परिसर शिक्षणापासून कोसो दूर ! त्यामुळे लोकांनी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांचेकडे शाळा काढण्याची विनंती केली. शैक्षणिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांच्या आग्रहास्तव " साधना विद्यालय "या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची निर्मिती करण्यात आली. सदर शाळेचे उद्घाटन व शाळा प्रवेश दिन आज २७ मे २०१९ ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी बालवाडी व इयत्ता १ लीचा वर्ग सुरु करण्यात आला असून दरवर्षी एक -एक वर्ग वाढविण्यात येणार आहे. यावर्षी जिंजगाव, मन्नेराजाराम, मडवेली, कत्रणगट्टा,  बामनपल्ली, बांडेनगर, गोरनुर, जोनावाही, येचली, मरमपल्ली,रेला इत्यादी गावातील बालवाडीला ३६ तर पाहिलीत  १८ असे एकूण ५४ विद्यार्थी आहेत.
 कार्यक्रमाचे संचालन शिक्षक झाडे  यांनी केले. प्रास्ताविक सिताराम मडावी तर उपस्थितांचे आभार इंदरशाह मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साधना विद्यालय जिंजगावच्या व्यवस्थापिका  समिक्षा गोडसे-आमटे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षक अमित कोहली, शिक्षक अजय वेलादी, सचिन सेगम, लता बतकू, करुणा गोवार्धन, सरोजनी कोठारी इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-27


Related Photos