बॉलिवूडचे प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचं निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर व अभिनेता अजय देवगण याचे वडील वीरू देवगण यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. वयोमानामुळं प्रकृती खालावलेल्या वीरू देवगण यांच्यावर सांताक्रूझ येथील सूर्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. 
वीरू देवगण यांनी बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी ॲक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. इन्कार, मि. नटवरलाल, क्रांती, शेहनशाह, हिंमतवाला, त्रिदेव, बाप नंबरी बेटा दस नंबरी, फुल और काँटे अशा अनेक चित्रपटातील अॅक्शन दृश्यं त्यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली होती. प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव असतानाही त्यांनी हिंदी चित्रपटात अनेक हटके अॅक्शन आणल्या. त्यामुळं त्यांची वेगळी ओळख निर्माण केली होती. १९९९ साली त्यांनी 'हिंदुस्तान की कसम' हा चित्रपटही दिग्दर्शित केला होता. त्यात अमिताभ बच्चन, अजय देवगण, मनीषा कोइराला, सुष्मिता सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. वीरू देवगण हे बॉलिवूडमधील पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये रमत नसत. अशा ठिकाणी ते क्वचितच दिसत. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अजय देवगणच्या 'टोटल धमाल' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेच नाहीत. विलेपार्ले पश्चिम येथील स्मशानभूमीत आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.   Print


News - Rajy | Posted : 2019-05-27


Related Photos