स्वीस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्या ११ भारतीयांना नोटीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत येताच स्वित्झर्लंडमधील स्वीस बँकेनेही काळा पैसा दडवणाऱ्या हिंदुस्थानींच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. स्वित्झर्लंड सरकारने नुकतेच एक गॅझेट प्रसिद्ध केले असून त्यात स्वीस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्या ११ हिंदुस्थानींना नोटीसा पाठवल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या खातेधारकांचे संपूर्ण नाव प्रसिद्ध न करता त्यांच्या नावातील सुरुवातीचे पहिले अक्षर गॅझेटमध्ये देण्यात आले आहे. स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत हिंदुस्थानी खातेधारकांना २५ वेळा नोटीसा पाठवल्या आहेत. यात त्यांची खासगी माहिती हिंदुस्थान सरकारला दिल्याबद्दल खातेदारकांना स्वीस बँकेविरोधात अपिल करण्याची शेवटची संधी देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
स्वित्झर्लंडच्या फेडरेल टॅक्स  ॲडमिनिस्ट्रेशनने या नोटीस पाठवल्या आहेत. या नोटीसमध्ये स्वीस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्या हिंदुस्थानींबरोबरच इतर देशातील खातेदारकांची माहितीही सार्वजनिक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या नोटीसीत खातेधारकाचे नावातील पहिले अक्षर, राष्ट्रीयत्व, जन्म तारखेचा उल्लेख करण्यात आला आहे. गॅझेटनुसार २१मे रोजी ११ भारतीयांना या नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, स्वीस अधिकाऱ्यांनी दोन भारतीय नागरिकांची पूर्ण नावे प्रसिद्ध केली आहेत. कृष्ण भगवान रामचंद्र आणि कल्पेश हर्षद किनारीवाला अशी या दोघांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे.

   Print


News - World | Posted : 2019-05-27


Related Photos