१५ हजार मतांपायी सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारुबंदीचा निर्णय घेतला : खा. बाळू धानोरकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  स्वत:च्या मतदारसंघातील १५ हजार मतांपायी सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारुबंदीचा निर्णय घेतला, अशी टीका राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी  केली आहे. चंद्रपूरमधील दारुबंदीचा निर्णय अयोग्यच होता. दारुबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला एका जिल्ह्यात दारुबंदी करुन काय साध्य होणार आहे. याऐवजी पूर्ण राज्यात किंवा देशातच दारुबंदी केली पाहिजे, असे  धानोरकर यांनी म्हटले आहे. 
चंद्रपूरमध्ये चार वर्षांपूर्वी दारुबंदी जाहीर झाली  याबाबत बोलताना  खासदार सुरेश धानोरकर म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत:च्या मतदारसंघातील १५ हजार मतांपायी हा निर्णय घेतला. पण दारुबंदीचा निर्णय चुकीचाच होता.  या निर्णयामुळे अनेक जण बेरोजगार झाले.  दारुबंदीमुळे शासनाचा महसूल बुडाला असून जिल्ह्यात अवैध मार्गाने दारुची विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकांना हा निर्णय पटलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.  चंद्रपूर जिल्ह्यात मोठमोठे उद्योगधंदे आहेत.  त्यांनी सांगितले. दारुबंदीचा निर्णय हा माझ्या अंतर्गत येत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी दारुबंदी उठवा अशी मागणी करणार का, या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले.
पाच वर्षांपासून चंद्रपूरमध्ये दारुबंदीचा मुद्दा गाजत आहे. महिलांच्या आंदोलनानंतर २०१५ पासून चंद्रपूरमध्ये दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला. धानोरकर हे स्वत: देखील दारुविक्रीच्या व्यवसायात सक्रीय आहेत. दारुबंदीमुळे चंद्रपूरमधील त्यांचा व्यवसाय बंद झाला आहे. निवडणुकीतही भाजपाने याच मुद्द्यावरुन धानोरकर यांच्यावर टीका केली होती.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-25


Related Photos