पुढील काँग्रेस अध्यक्ष गांधी परिवारातून नसावा , राहुल गांधींचा प्रस्ताव


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा सादर केला मात्र कार्यकारिणीने हा राजीनामा एकमताने फेटाळून लावला. काँग्रेससाठी हा आव्हानात्मक काळ आहे आणि अशावेळी आपल्या नेतृत्वाची पक्षाला नितांत गरज आहे, असे नमूद करत राहुल यांनीच पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, असा आग्रह कार्यकारिणीने केला.  दरम्यान पुढील काँग्रेस अध्यक्ष गांधी परिवारातून नसावा  असा प्रस्ताव राहुल गांधी यांनी ठेवला आहे. 
कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. देशातील जनतेने जो कौल दिला आहे त्याचा काँग्रेस आदर करत आहे. पक्षावर देशातील १२ कोटीपेक्षाही अधिक मतदारांनी विश्वास व्यक्त केला असून त्यांचे आम्ही आभार मानत आहोत, असे सुरजेवाला पुढे म्हणाले.  लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर आज चिंतन करण्यात आलं. त्याअंती पक्षाच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यावर एकमत झालं असून त्याचे सर्वाधिकार राहुल यांच्याकडे देण्याचा निर्णय कार्यकारिणीत घेण्यात आल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितले. 



  Print






News - World | Posted : 2019-05-25






Related Photos