राहुल गांधींचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव करणारे डॉ. के. पी.यादव चंद्रपूरचे जावई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी /  चंद्रपूर :
  देशाच्या राजकारणातील काँग्रेसचे दिग्गज नेते,  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे  ज्योतिरादित्य शिंदे  यांचा पराभव करणारे भाजपचे उमेदवार  डॉ. के. पी.यादव हे  चंद्रपूरच्या वडगाव प्रभागातील रहिवासी जनता महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक भाऊराव जांभूळकर व शालिनीताई  जांभूळकर  यांचे जावई आहेत. 
यापूर्वी झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत केवळ दोन हजार मतांनी पराभव झाल्यानंतर भाजपने यादव यांना गुना मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिली. विशेष म्हणजे एकेकाळी त्यांच्या कुटुंबाचे माधवराव शिंदे यांचे घराण्याशी अतिशय घनिष्ठ संबंध होते. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले. यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. यावेळी शिंदे यांच्या पत्नी प्रियदर्शिनी राजे सिंधिया यांनी डॉ. यादव यांचा कारमध्ये बसलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत सेल्फी घेतानाच फोटो व्हायरल करून डॉ. यादव हे सेल्फीसाठी रांगेत उभे असायचे असे म्हणत खिल्ली उडविली होती. यामुळे डॉ. यादव यांच्या विजयानंतर त्यांच्या सेल्फीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 
डॉ. के.पी. यादव यांच्या पत्नी डॉ. अनुराधा यादव यांचा जन्म चंद्रपुरात झाला . त्यांचे वैद्यकीय शिक्षण नागपुरात  सुरु असताना  डॉ. के.पी. यादव यांच्याशी ओळख झाली व त्यांचा विवाह झाला. डॉ. यादव यांना राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. गुना येथे वास्तव्यास असताना त्यांचा राजकारणात प्रवेश झाला होता.  गुना लोकसभा मतदारसंघात डॉ. के. पी. यादव यांनी ६ लाख १४ हजार ०४९ मतं मिळवत विजय साकारला, तर ज्योतिरादित्य शिंदे यांना ४,८८,५०० मतं मिळाली.    Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-25


Related Photos