३० मे रोजी होणार मोदी सरकारचा शपथविधी ?


वृत्तसंस्था / नवी दिल्ली  : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज, शनिवारी सायंकाळी ५ वाजता संसदेच्या केंद्रीय सभागृहात भाजपच्या तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. बैठकीनंतर लगेचच मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी दावा करण्याची शक्यता आहे. मोदी सरकारचा शपथविधी ३० मे रोजी होणार आहे. 
केंद्रात पूर्ण बहुमताने सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप-रालोआच्या या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोजपाचे अध्यक्ष रामविलास पासवान, अकाली दलाचे नेते सुखबीरसिंह बादल आदी नेते उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात सदस्यांच्या समावेशासाठी तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या खात्यांविषयी चर्चा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज, शनिवारी आणि उद्या, रविवारी रालोआच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे भेटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना पुढील शंभर दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. मागच्या पाच वर्षांमध्ये अपूर्ण राहिलेल्या कामांना प्राधान्याने पूर्ण करण्यावर भाजपने भर देण्याचे ठरविले आहे. 
सायंकाळी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होऊन त्यात सोळावी लोकसभा विसर्जित करण्याच्या शिफारसीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा उपचार पूर्ण केला आणि नवे सरकार स्थापन होईपर्यंत राष्ट्रपतींनी मोदींना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याचा आग्रह केला.    Print


News - World | Posted : 2019-05-25


Related Photos