महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे ध्येय : मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे


- जिल्हास्तरीय शिक्षण परिषद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपूर्ण क्षमतांचा विकास साधणे, हे आपल्या शिक्षणाचे पहिले उद्दिष्ट असून विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांचा विकास साधून त्यांना उच्चस्तरीय सर्व क्षमता व कौशल्ये अवगत करण्यासाठी प्रेरित करणे महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण व पात्र व्हावे यादृष्टीने त्यांना शाळांमध्ये सराव, दर्जेदार शिक्षण व अध्ययन अनुभव मिळणे गरजेचे आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.

शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. घुगे यांचे संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील शिक्षक व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती यांची उपस्थितीती होती. प्रत्येक तालुक्यातून दोन शिक्षकांनी आपल्या शाळेत राबवत असलेल्या नाविन्यपूर्ण व विद्यार्थ्यांच्या संपादणूक वाढीसाठी उपयुक्त अशा उपक्रमांचे सादरीकरण केले.

या सादरीकरणातून इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी सुरु असलेल्या नवनवीन उपक्रमांचा परिचय झाला. या उपक्रमांमध्ये शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षेची तयारी व प्रश्नांचा सराव करून घेण्यासाठी टेलीग्रामचा वापर करून दैनंदिन प्रश्नांची मालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, सेल्फी विथ सक्सेस, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनास चालना, सहाध्यायी अध्ययन, विद्यार्थ्यांच्या उच्चस्तरीय क्षमतांचा विकास, आनंददायी, खेळावर आधारित भाषा व गणिताच्या कृतियुक्त अध्ययन तंत्रांचा अध्यापनात वापर, प्रत्यक्ष कृती व विद्यार्थी आंतरक्रियांच्या माध्यमातून अंकगणितिय कौशल्यांचा विकास करणे.

परिसरात व शाळेत उपलब्ध भाषा व गणित शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना हाताळायला देऊन त्यातून त्यांना स्वयं अध्ययनाची संधी, विषयमित्रांच्या मदतीने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय विविध विषयांच्या अध्ययनात येणारे अडथळे दूर करून खेळीमेळीच्या वातावरणात त्यांची प्रगती साधणे, काळाच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास साधण्यासाठी प्रयोग, कृती, निरीक्षणे, प्रात्यक्षिके, गटकार्य या साधनतंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्ययनास चालना देणे, विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना ओळखणे व त्या गुणवैशिष्ट्यांच्या विकासाला चालना देणे, त्यांच्या भाषा व गणितातील पायाभूत क्षमतांचा विकास साधणे अशा उपक्रमांचा समावेश होता.

परिषदेत प्राचार्य मंगेश घोगरे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा समन्वयक तथा वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नितु गावंडे यांनी या शिक्षण परिषदेचे नियोजन व संनियंत्रण केले. संचालन अधिव्याख्याता डॉ. उर्मिला हाडेकर यांनी केले. अधिव्याख्याता डॉ. सीमा पुसदकर, दिपाली बासोळे, प्रतिभा देशपांडे, विषय साधनव्यक्ती मनीष जगताप, दीपक आखाडे व संस्थेचे इतर कर्मचारी यांनी या आयोजनासाठी सहकार्य केले.





  Print






News - Wardha




Related Photos