महत्वाच्या बातम्या

 स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे


-  उमेद अंतर्गत एक दिवसीय बँकर्स कार्यशाळा

-  उत्कृष्ट काम करणाऱ्या बँक शाखा व सखींचा सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील महिला बचतगटाचे काम चांगले आहे. गटाला बँकेद्वारे योग्य सहकार्य मिळाले तर महिलांना उपजीविकेचे चांगले साधन निर्माण करता येईल. बँक लिंकेज सोबत पोकरा, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुद्रा अशा विविध योजनेचा सुद्धा महिलांना लाभ बँकेद्वारे देता येईल. यासाठी बँकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात एक दिवसीय बँकर्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, अग्रणी बँक प्रबंधक चेतन शिरभाते, नाबार्डचे जिल्हा व्यस्थापक सुशांत पाटील, उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कमलेश जैन, कृषी पर्यवेक्षक डोंगरे, प्रशिक्षक निलेश परातकर, एन. के. सिंग, खंडेराव दीक्षित, उमेदच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, जिल्हा व्यवस्थापक प्रकाश पोलकडे, मनीष कावडे, रवी लाटेलवार, सुरज बोबडे, पुजा कंडे उपस्थित होते.

जिल्ह्याला सन २०२२-२३ मध्ये एकूण ९ हजार ३०० गटांकरिता १९५ कोटीचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ११ हजार ८९ स्वयंसहाय्यता गटांना २६९ कोटींचे वितरण करण्यात आले. ज्या बँक शाखेने स्वयंसहाय्यता गटांना जास्त कर्ज पुरवठा केला अशा निवडक बँक व्यवस्थापक व बँक सखींचा बँकर्स कार्यशाळेचे औचित्य साधून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

उमेद अंतर्गत प्रत्येकवर्षी बँकर्स कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या कार्यशाळेमध्ये बँक लिंकेज पोर्टल व स्वयंसहाय्यता बचतगटांना कर्ज वितरण कसे करावे, याबाबत सर्व बँकर्सना प्रशिक्षण देण्यात येते. जिल्ह्यात अभियानांतर्गत १४ हजार ३०९ स्वयंसहाय्यता गट कार्यरत असून ९५० ग्रामसंघ व ४९ प्रभाग संघ कार्यरत आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरण व उपजीविकेचे साधन तयार करण्याचे काम अविरत सुरु आहे.

बँकांनी यावर्षी जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करून जिल्ह्याला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी बँकर्सने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन श्री.घुगे यांनी केले. बँकेद्वारे गरीबातील गरीब कुटुंबापर्यंत बँकेच्या आर्थिक सेवा पोहचणे व स्वयंसहायता गट सदस्यांची आर्थिक साक्षरता वाढविणे यासाठी उमेद प्रकल्पाच्या अंतर्गत विविध प्रयत्न करण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या उपजीविकेच्या साधनामध्ये वाढ करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे व त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी उमेद अभियान प्रयत्नशील आहे.





  Print






News - Wardha




Related Photos