महत्वाच्या बातम्या

 आयुष्मान भव मोहीमेला १ सप्टेंबरपासून प्रारंभ 


- जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवा, अशी सूचना आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुंवर यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विशेष मोहीमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्यविषयक उपक्रम, मोहीमा राबविताना सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

जिल्हा आरोग्य अधिकारी सोमकुंवर यांनी यावेळी मोहीमेचे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांसमोर केले. आयुष्मान आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आजतागायत देशभरात २५ कोटी आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा या उपक्रमांतर्गत आयुष्मान कार्ड व आभा कार्डविषयी जनजागृती करणे, आरोग्यवर्धीनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

आयुष्यमान मेळावा या उपक्रमाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्यवर्धीनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवार किंवा रविवारी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे. कम्युनिटी हेल्थ सेंटर स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची (० ते १८ वयोगट) विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos