सुरजागड येथील उत्खनन, लोहप्रकल्पाला आता तरी गती मिळेल काय?


- असंख्य बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जंगल व खनीजांनी परिपूर्ण असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड येथील पहाडीवर लोहखनीज उत्खनन सुरू होते. तसेच चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारणीचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र आता उत्खनन आणि प्रकल्प उभारणीचे कामही ठप्प आहे. यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. आता लोकसभा निवडणूक संपुष्टात आली असून प्रशासनाने खनीजे उत्खनन तसेच लोहप्रकल्पाच्या उभारणीच्या कामाला गती देण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
सुरजागड येथे लोहखनीजे उत्खनन सुरू करण्यात आले होते. काही कालावधीनंतर या ठिकाणी नक्षल्यांनी मोठ्या प्रमाणात वाहने जाळल्याने काम बंद पडले होते. यानंतर प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात करून काम सुरू केले होते. यामुळे शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळाला होता. मात्र जानेवारी महिन्यात झालेल्या एका अपघातामुळे काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने करून पुन्हा काम बंद पाडले. तेव्हापासून उत्खननाचे काम बंदच आहे. यावेळी कामगारांनी आंदोलने करून काम सुरु करण्याची मागणी केली होती. प्रशासन आणि कंपनी तर्फे काम सुरु करण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घ्यायला लावले होते. मात्र  निवडणूकीच्या कालावधीत सुरक्षा पुरविण्याचे कारण देत पोलिस बंदोबस्त काढण्यात आला. आता निवडणूकीचे काम आटोपले असून प्रशासनाने योग्य सुरक्षा पुरवून पुन्हा काम सुरू करण्याची गरज आहे. 
जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे लोहखनीजे उत्खनन तसेच लोहप्रकल्पात अनेकांना रोजगार मिळू शकतो. भाजपा सरकारच्या काळात या कामांचा शुभारंभ करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा केंद्रात भाजपाचे सरकार स्थापन होत आहे. यामुळे बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-24


Related Photos