लोकसभा निवडणुकीत २३ राज्यांतून काँग्रेस हद्दपार, ६ राज्यांत काँग्रेसला केवळ एक जागा


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :  काल जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या ;निकालात भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निवडणुकीत देशातील २३ राज्यांतून काँग्रेस जवळपास हद्दपार झाली आहे. या २३ पैकी १७ राज्य काँग्रेसमुक्त झाले आहेत, तर ६ राज्यांत काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे. 
कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान विधानसभेत सत्ता मिळूनही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. छत्तीसगडमध्येही काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली आहे.  केंद्रशासित प्रदेशही काँग्रेसमुक्त झाल्याचं चित्रं आहे. 
जम्मू-काश्मीरमध्ये ६ जागांपैकी ३ जागांवर भाजप तर ३ जागांवर नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे. या ठिकाणी काँग्रेसला खातंही खोलता आलं नाही. अंदमान निकोबारमधील केवळ एकमेव जागेवर भाजप विजयी झाले आहे. या ठिकाणी काँग्रेस नावालाही उरलेली नाही.  आंध्रप्रदेशातील २५ जागांपैकी २४ जागांवर वायएसआर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केलं असून टीडीपीला केवळ एक जागा मिळाली आहे. आंध्रात काँग्रेसप्रमाणेच भाजपलाही खातं खोलता आलेलं नाही. 
पूर्वेकडील महत्त्वाचं राज्य मानलं जाणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील दोन्ही जागांवर भाजपच निवडून आहे.  लालू प्रसाद यादव यांच्यासोबत युती करून लढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न बिहारमध्ये फारसा यशस्वी झाला नाही. भाजप आणि जेडीयूने येथील प्रत्येकी १६ जागांवर आघाडी घेतली असून रामविलास पासवान यांच्या लोजपाने ६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर लालूंच्या आरजेडीने १ आणि काँग्रेसनेही केवळ एका जागेवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे बिहार सुद्धा काँग्रेसमुक्त झाल्याचं चित्रं आहे. 
चंदीगडमधील एकमेव जागेवर भाजपच्या उमेदवार किरण खेर यांनी आघाडी घेतली आहे. तिथे काँग्रेस नेते पवन कुमार बंसल यांचा पराभव झाला आहे.  दादरा आणि नगर हवेलीतील एकमेव जागा भाजपनं जिंकली आहे.  दमन दीवमध्येही लोकसभेची एकच जागा असून तिथे भाजपनं विजय मिळवला आहे. 
विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर गुजरातमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळेल असं वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात गुजरातही काँग्रेसमुक्त झालं आहे. गुजरातमधील २६ पैकी २६ जागांवर भाजपनं दणदणीत विजय मिळविला आहे.  हरयाणातही भाजपने दहाही जागांवर विजय मिळवत काँग्रेसला आस्मान दाखवलं आहे.  हिमाचल प्रदेशातही भाजपने विजयाची घोडदौड सुरूच ठेवली आहे. हिमाचलमध्ये भाजपने चारही जागा जिंकल्या आहेत. २०१४ मध्येही काँग्रेसला हिमाचलमध्ये खातंही खोलता आलं नव्हतं. 
उत्तराखंडमधील पाचही जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे उत्तराखंड सुद्धा काँग्रेसमुक्त झाल्याचं चित्रं आहे.  मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता मिळवली. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसला मोठं यश मिळेल असं म्हटलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात मध्यप्रदेशातील २९ जागांवर भाजपने कब्जा केला  असून काँग्रेस केवळ एकाच जागेवर  आहे. 
महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळविता आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ने ३ जागा जिंकून काँग्रेसला मागे टाकले आहे. या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींविरोधात प्रचार केला होता. पण तरीही त्याचा काँग्रेसला फायदा झाला नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने सर्व जागांवर उमेदवार दिल्याने त्याचा दोन्ही काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे अशोक चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय. 
मणिपूरमध्ये अवघ्या दोनच जागा आहेत. त्यापैकी एका जागेवर भाजप तर दुसऱ्या जागेवर नागा पिपल्स फ्रंटने विजय मिळवून काँग्रेसला मणिपूरमधून हद्दपार केलं आहे.  मिझोरामधील एकमेव जागेवर मिझो नॅशनल फ्रंटने आघाडी घेतली आहे.  ओडिशातील ७ जागांवर भाजपने तर १४ जागांवर बीजेडीने आघाडी घेतली आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला ओडिशात खातंही खोललेलं नाही.  दिल्लीत काँग्रेस आणि आपमधील भांडणाचा भाजपला जबरदस्त फायदा झाला आहे. दिल्लीतील सातही जागांवर भाजपनं विजय मिळविला  आहे. 
राजस्थान पुन्हा एकदा भाजपचंच असल्याचं सिद्ध झालं आहे. राजस्थानमध्ये सत्ता असूनही काँग्रेसला यश मिळविता आलेलं नाही. या ठिकाणी भाजपनं २४ जागांवर विजय मिळविला  आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने एका जागेवर विजय मिळविला  आहे. 
 सिक्कीममधील एकमेव जागेवर सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने आघाडी घेतली आहे.  राज्यातील दोन्ही लोकसभा जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे 
उत्तर प्रदेशात बसपा आणि सपाशी आघाडी न करणं काँग्रेसला महागात पडलं आहे. उत्तर प्रदेशातील ८० पैकी केवळ एकाच जागेवर काँग्रेस विजयी झाली आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची परंपरागत सीट असलेल्या अमेठीतून राहुल गांधी यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. उत्तर प्रदेशात ५९ जागांवर भाजप, ६ जागांवर सपा आणि १२ जागांवर बसपा आघाडीवर आहे.  पश्चिम बंगालमधील ४१ जागांपैकी २२ जागांवर तृणमूल तर १९ जागांवर भाजपनं विजय मिळविला आहे. या ठिकाणी काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मिळाले  आहे.   Print


News - World | Posted : 2019-05-24


Related Photos